‘वैभव दोनतलावचे’ (३१/०५/२०२०)

 ‘दोनतलाव’ हे आपल्या गावाचं नाव गावात दोन तळे असल्यामुळे पडलेलं आहे. आपल्या गावातील हि दोन तळे व मधून एक मेन रोड म्हणजे गावाची अपूर्व अशी शोभा. पूर्वेकडील तलाव मोठे व भव्य असे आहे तर पच्छीमेकडील तलाव त्या मानाने छोटे. ह्या तलावांना सासू- सुनेचे तलाव ( हाऊ- ओसा) ह्या नावानेही ओळखले जात होते. ह्यातील मोठे तलाव म्हणजे ‘सासू’ व लहान तलाव म्हणजे ‘सुन’. पूर्वी आपल्या गावाला विसरोडी ह्या नावानेही संबोधीले जात असे. आगाशीला कातरवाडी जवळ सुध्दा विसरोडी नावाचे एक छोटे गाव आहे. समान नावामुळे व्यवहारात बराच गोंधळ व्हायचा. कालांतराने आपल्या गावक-यांनीच दोनतलाव या नावाला मुक संमती दिली व पुढे दोनतलाव हे नाव प्रचलित झालं . तत्पूर्वी आपल्या गावाला जवतळे म्हणूनही आोळखले जात असे. पंचायत दफ्तरीसुद्धा जवतळे म्हणूनच नोंद आहे. जवतळा हा तसा फार जुणा शब्द. त्याचा अर्थही दोनतलावच. काहीक लोक अजूनसुद्धा जवतळा हे नाव वापरतात. आम्ही लहान असताना म्हणजे जवळ जवळ ५५ ते ६० वर्षा पूर्वीची एक आठवण. त्यावेळेला लाईट नव्हती. सध्याच्या जाॅनी-माॅनी म्हणजे संदिपच्या घरा जवळील रस्तयाच्या काॅर्नरवर एक दिवा बत्तीचा लाकडी पोल होता. ह्या पोलवरती एक चौकोणी बत्ती बसवलेली होती. तेव्हा रोज संध्याकाळी सहा वाजता गणेशकाका नावाचे पंचायतीचे एक कर्मचारी खांद्द्यावर शिडी व हातात एक राॅकेलने भरलेला डबा घेऊन यायचे. शिडी पोलला तीरपी ऊभी करून वर चढायचे बत्तीत तेल भरायचे व मॅचीसने बत्तीची वात पेटवायचे. ( हे दृश्य बघायला आम्हाला फार मजा यायची) बत्तीला चारही बाजूने काच असल्यामुळे बत्ती विझत नसे व संपूर्ण रात्र बत्तीचा उजेड रस्त्यावर पसरत असे. अशाप्रकारे गणेशकाका रस्त्यावरील निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या बत्त्या पेटवत पुढे निघून जात. तर जाॅनीमाॅनी घराजवळील ह्याच बत्ती शेजारी एक सहा-सात फूट ऊंचीचा एक लाकडी पोल होता व त्यांवर एक चौकोणी पाटी होती. त्या पाटीवर आपल्या गावाचे ‘जवतळे’ हे नाव लिहीलेले होते. 


 ‘दोनतलाव’ ह्या नावात ‘दोन’हा जो शब्द आहे ह्या शब्दाचे व आपल्या गावाचे कुठेतरी ऋणानुबंध असल्या सारखे वाटते. गावाचे नाव दोनतलाव, गावात प्रवेशासाठी दोन वेशी, गावात दोन क्राॅस व गावाच्या दोन्ही वेशीजवळ दोन भलेमोठे पिंपळाचे वृक्ष (सद्द्या एकच वृक्ष आहे.) अशाप्रकारे ‘दोन’ हा शब्द गावाला घट्ट मिठी मारून आहे. 


आता थोडंसं पिंपळा विषयी:-


भारतात पिंपळ ह्या वृक्षाला फार धर्मिक महत्व आहे. बौद्ध आणि हिंदू ह्या दोन्ही धर्मात पिपळाला पवित्र मानले जाते. इ. स. पूर्व ५२८, ८ डिसेंबर रोजी गौतम बुद्धाला बिहार मधील बोधगया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली म्हणून पिंपळाला बोधिवृक्ष म्हटले जाते. हा वृक्ष अजूनही बोधगया येथे आहे. पिंपळाच्या वृक्षाला भरपूर म्हणजे २००० ते ३००० वर्षे आयुष्य असते म्हणून ह्या वृक्षाला ‘अक्षय वृक्ष’ असेही म्हणतात. 


तर हिंदू पुराणानुसार पिंपळ वृक्षांत साक्षात भगवान विष्णूचा व लक्ष्मीचा रहीवास असतो. पिंपळाचे विशेष म्हणजे हे झाड २४ तास प्राणवायू देत असते. पिंपळाच्या पानात अनेक आयुर्वेदीक गुण आहेत. मधुमेह, अस्थमा, मुलांचे पोटातील आजार, कावीळ, दात दुखी, खळूवरील भेगा, शारीरीक दौर्बल्य वगैरे आजारावर पिंपळ हे बहू गुणकारी आहे.       

                                           

आपल्या गावातील ऊत्तरेकडच्या वेशीवर जे पिंपळाचे झाड होते ते रस्त्याच्या कडेला साधारणपणे मिंगू दमेल व तेत्याबाबा ह्याच्या घराच्या मध्यावर होते. आम्ही गावातील लहान मुले दुपारी ह्या झाडाखाली सावलीमध्ये विटीदांडू वा तत्सम खेळ खेळत असू. पुढे ह्या झाडाचा बुंधा बसच्या टपाला वा ट्रकच्या उंच छपराला धडकायचा त्यामुळे पंचायतीने हे झाड विकायचे ठरवले. पण हिंदू धर्मानुसार पिंपळ कापणे हे महापाप समजले जाई म्हणून कोणीही झाड विकत घ्यायला वा कापायला तयार होईना. पंचायत पंचायतीत पडली. झाड कापणं तर भाग होतं. त्यावेळेला आपले मास्तर काका (अ. चि. दमेल) हे सरपंच होते. निर्णय त्यांना बंघनकारक होता. म्हणून केवळ नाईलाजाने त्यांनी हे झाड केवळ ४०/- रूपयांत विकत घेतले, विचार हा कि जळाऊ लाकूड म्हणून तरी ऊपयोगात येईल. पुढे थोड्याच दिवसात केवळ नाईलाजाने हे झाड कापवे लागले. गावाची एक भव्य शोभा क्षणार्धात जमीनदोस्त झाली. दोनतलाव गावाची शान गेली. संपूर्ण गाव हळहळले. त्या वृक्षाच्या अंगाखांद्यावर खेळणारी आम्ही बालगोपाळ मुले खिन्न व सुन्न झालो. एक इतिहास पडद्द्याआड गेला. आजही ते भले मोठे पिंपळ वृक्ष अगदी डोळ्यांसमोर उभे राहते. मास्तर काकांना हे झाड म्हणजे ‘गाड्यापेक्षा भाडा महाग’ ह्या हिशोबात पडले. सारखे जळत नव्हते. नुसता घरात धुर व्हायचा. शेवटी निरूपयोगी म्हणून पडूनच राहिले.  

आपल्या कडे अशी बरीच भव्य पिंपळाची झाडे आपल्या वसई परीसरात दिसून येतात. काहीक झाडा भोवती चौकोणी पार सुद्धा बांधिलेले आहेत. त्यातील काही स्मरणात असलेली झाडे:- 


१) आपल्या गावातील दक्षिण वेशीवरील एक झाड (पार नाही)

२) उंबरगोठन मारुती मंदीराबाजूचे पिंपळाचे झाड (पार नाही)

३) चाळपेठ चाररस्त्यावरील झाड ( पार आहे)

४) आगाशी झेंडाबाजारातील झाड (पार आहे)

५) अर्नाळा सुभाष लेन वरील झाड (पार आहे)

६) अर्नाळ मेन मार्केट मधील झाड (पार आहे)

७) बोळींज ब्राम्हण आळी मेन रोडवरील झाड (पार आहे)

८) चक्रेश्वर तलाव सोपारा येथील झाड (पार आहे) इत्यादी. ह्या झाडांचे वयं माहीत नाही तरी ती ५०० वर्षा पूर्वीचे असतील असे वाटते.


अशा ह्या दोन पवित्र झाडाचे सानिध्य, दोन पवित्र तलावाचे मांगल्य, व दोन पवित्र क्राॅसचे संरक्षण असल्या मुळे आपला गाव अतिपावन झालेला आहे. असा आपला दोनतलाव गाव ज्ञानी वा हुशार का? तर हे दोन बोधीवृक्ष, पवित्र का? तर हे दोन बोधिवृक्ष , निरोगी का? तर हे दोन बोधिवृक्ष . 


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013