फटाक्याचं वेड (१४/०१/२०२०)

 माझ्या लाहानपणीची गोष्ट. मी तिसरी-चौथीत असेन. बहुदा तिसरीतच. म्हणजे जवळ- जवळ ५५ वर्षा अगोदरची गोष्ट. मला लहानपणी फटाक्याची फार आवड. फटाके बहुदा दिवाळीलाच फोडले जात. ऊंबरगोठणला त्यावेळी कामतचे व बाबूशेट ह्या गुजराती व्यापा-यांचे असे दोन किराणामालाची दुकाने व गोपाळ व पांगळ्याकाकाचे असे दोन हाॅटेल/रेस्टोरंट होती. तर हे व्यापारी लोक दिवाळीला आपआपल्या दुकानासमोर फटाके फोडायचे. शाळेला दिवाळीची सुट्टी असायची पण फटाके आणायला पैसे नसायचे.


मी आणि बब्या बाल मित्र. आम्हा दोघांची फार मैत्री. आम्ही फटाक्यांचा धमाका बघण्यासाठी ऊंबरगोठणला व्यापा-यांच्या दुकानासमोर जायचो व फटाक्यांच्या स्फोटांची (ठो-ठो आवाजाची) मजा लुटायचो. घरी मी केपची डबी घेण्यासाठी एक आणा जीजी कडे मागायचो व जीजी कुरकूर न करता मला कधीकधी द्द्यायची. त्या डबीत २० ते २५ टिकली सारखे लाल फटाके असायचे. घरी पायरीवर एक-एक टिकली फटाका ठेवून छोट्या दगडाच्या सहाय्याने ते फोडयचो. ती एक डबी आम्ही दोन ते तीन दिवस पुरवायचो. बाबा मध्येच कधी फुलबाज्याचं(सुंदरकाडी) बाॅक्स, भुईचक्र किंवा नाग फटाका आणायचे व त्याची आम्ही रात्रीच्या अंधारात फुलबाज्या पेटवून मस्त मजा लुटायचो. पण ह्या पेक्षा मोठे फटाके फोडायचा आनंद आम्हाला कधी मिळत नव्हता. आम्ही ऊंबरगोठणला जायचो कच-यातून अर्धवट जळालेले व न फुटलेले फटाके गोळा करायचो. घरी आल्यानंतर ते फटाके सोलून त्यातून वात बाहेर काढायची. चुलीतून ऊलथानावरून आगीचा इंगळ आणायचा व त्या इंगळावर सोललेल्या फटाक्याची वात ठेवायची. नशिबाने एखादा फटाका ॲटमबाॅंब सारखा आवाजकरून फुटलाच तर काय तो अवर्णनीय आनंद, गगनात न मावण्या सारखा.


तर असेच एकदा घरी फटाके फोडून झाल्यानंतर शिल्लक राहीलेला फटाक्याचा कचरा मी गोळाकरून पिली-अनीच्या विझलेल्या चुलीत टाकला व वरून राख पसरवली. आणि मी वरच्या व्हरांड्यात खाटेवरील गोदडी मध्ये लोळत पडलो. साधारण एक तासाभरानंतर नाना, मास्तरकाका, पिली व अनी जेवायला बसली. जेवण अर्धवट आटोपलं असेल इतक्यात चुलीत जोराचा ठो असा एकच धमाका झाला. चुलीतली सर्व राख वर ऊडाली व ह्यांच्या डोक्यावर व ताटातील जेवणावर राखचराख पसरली. संपूर्ण स्वयंपाक घर राखण्यात झाले. क्षणभर कोणाला काही कळलेच नाही. मी माझं कृत्य विसरूनच गेलो होतो. मलाही काही कळले नाही. मी सुद्धा घाबरून गेलो. एवढ्यात अनदादय बोलली की पात्रीस ईथे काहीतरी करीत होता. माझं नाव ऐकताच मी जी खाटेतून उडी मारली ती थेट ऊभं राहायला वरच्या माळावर. जवळजवळ दोन तास वरतीच कणगीच्या फटीत लपून बसलो होतो. साधारण चारच्या सुमारास थोडासा कानोसा घेत घेत खाली सामसुम आहे ह्याचा अंदाज घेऊन मी खाली उतरलो व गोदडीत जाऊन डोक्यावरून पांघरून घेऊन झोपलो. 


घरात आठवडाभर विषयच अगदी हा होता!


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013