आपल्या तेव बद्दलची एक आठवण (०९/०८/२०१९)
तर तेव म्हणजे तेरस काकय. पुढे तीला सर्व जण तीच्या मुलांच्या हाकेनुसार तेव ह्या नावाने संबोधायला लागले. नात्याबाहेरील माणसेही तीची खबर विचारताना ‘तुमची तेव कशी आहे म्हणून विचारतात. झुज्या दमेल व चिमा दमेल ह्या दोन भावांच्या मिळून एकूण सहा सूना. त्यातील तेव ही सहावी म्हणजेच धाकटी सून. पैकी पाच मोठ्या सूना देवाघरी गेलेल्या आहेत.
मी लहान होतो. साधारण चौथी -पाचवीत असेन. तेव्हाची गोष्ट. दिवस -वार काही आठवत नाही. तेव सकाळी ऊठून कानभाट वाडीत गेली होती. दुपारी बाराच्या सुमारास ती घरी परतली. रोजीबाय म्हणजे लडकुकाकाची आई म्हणजेच राॅबर्ट सरांची आजी ह्याच्या घरासमोरून येताना रोजीबाय - मणीबाय ह्या मायलेकीशी बोलून ती घरी पोहचली. साधारण पंधरा मिनीटानंतर रोजीबाय-मणीबायला त्याच्या अंगणातील रचलेल्या लाकडात एक छोटा साप जाताना नजरेस पडला. तलावातून आलेले दिवड वगैरे असेल असे मनात आणून ते विसरून गेले. दुपारी अडीचच्या सुमारास रोजीबाय पिंड्यावरती व मणीबाय हिंदोळ्यावरती बसून गप्पा करीत होत्या आणि त्याच वेळेला तेव त्याच्या अंगणातून कानभाटात जायला निघाली. आणि त्याच वेळी दुपारी पाहीलेला तो छोटा साप बाहेर ऊतरून तेवच्या मागावर जाताना मणीबायच्या नजरेस पडला. दुपारी तेव जेव्हा घरी आली तेव्हा तो साप आला आणि आता तेव घरातून वाडीत जाताना ताे तिच्या मागे निघाला. काहीतरी गडबड आहे म्हणून मणीबायने आवाज केला तेव्हा तेव मागे फिरली व तो साप सुद्धा परत लाकडात घुसला. गावातील व शेजारील लोक जमा झाले. आम्ही बरेच मुलेही जमा झाली. पण लाकडात घुसलेला साप शोधायचा आणि मारायचा कुणी?
अशा विचारात असतानाच आपले नाना म्हणजे पेदरबाबा व लुईस अण्णाचे वडील घरातून बरशी घेऊन आले. ते साप मारण्यात पटाईत तसेच हिम्मतवान होते. हाताने लाकडे सरकवायला सुरूवात केली व थोड्याच वेळात एका बारीक पाचरीला विळखा घातलेला तो साप नजरेस पडला. लगेच बरशी टोचून त्यांनी साप जखमी केला व बाहेर काढला. तेवला बोलवलं. साप पाहून तेवने सांगितलं की हाच साप तिने कानभाटात वांग्याच्या कुडीवर पाहीला होता. तीला काहीतरी बोलाया सांगितलं. तेव जसं जसं बोलत होती तेव्हा तो साप आपल्या शेपटीला गाठी मारीत होता. तेव्हा सर्व जण समजले की तेव जवळून नकळत सापाला नक्कीच दुखावलं गेलेलं आहे. सापाने तेव वरती डुख धरलेला आहे (आपल्या भाषेत हटावलेला आहे किंवा हट धरलेला आहे) नंतर तो साप मारण्यात आला. सापाला ऊलट फिरवून त्याची राळ पाहण्यात आली. नानाने सांगितलं की हा साप रूखय ह्या नावाने ओळखला जातो तसेच सापाची ही जात फार विषारी असते. हा साप दिड राळीचा होता म्हणजे चावल्यानंतर माणूस दिड तासात मरतो.
तर अशा ह्या विषारी सापा पासुन आपली तेव वाचली. आज तेव ८५ च्या घरात पोहचली आहे. म्हातारपण हाच आजार आहे. बाकी एकदम ठणठणीत आहे.
शिमनीबाय, बिशा, मायकल, पांडया व तीन सुना ह्याच्या सेवेत ती आहे.
----समाप्त---/