“बट्या गुरूजींना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, व पुष्पांजली”

 गुरूजी, वॅाटस्ॲपच्या अनेक ग्रुप वरती तुम्हाला धो धो पावसा सारख्या श्रद्धांजली वाहील्या गेल्या. त्यातीलच एक ओझरती धार म्हणून माझी ही श्रध्दांजली.  

              —-

“गुरू: ब्रम्हा: गुरू: विष्णू: गुरूर्देवो महेश्वर:। गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नम: ।।

गुरूजी, तुम्ही माझे दुसरी इयत्तीचे क्लासटिचर, सन १९६१.  

शिष्याला ज्ञानरूपी प्रकाश देणारा व त्याचे जीवन उज्वल करणारा महान योगी म्हणजे गुरू. आपल्याकडे असलेले ज्ञानरूपी भंडार निस्वार्थी पणे शिष्याला देणारा तपस्वी म्हणजे गुरू. भुतकाळाचा दुवा आणि भविष्य काळाचा दिवा म्हणजे गुर. गुरू हे इश्वरी रुप आहे. गुरूचे ऋण कधीही न फेडणारेच असते. तो चोरी करायला शिकवतो पण फक्त आणि फक्त ज्ञानाचीच चोरी.

मला हे सर्व गुण बट्या गुरूजीत दिसतात. म्हणून ह्या गुणवंत गुरूचा मी शिष्य असल्याचा मला रास्त अभिमान वाटतो.

दुसरी इयत्ते नंतर हेच गुरूजी मला पाचवीत हिन्दी शिकवण्यास आले. हिन्दी भाषा आपल्या शिष्याच्या डोक्यात कशी उतरवायची ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बट्या गरूजी. त्या काळात आपल्या कडील बायका बाजारात गमतीशीर हिन्दीत बोलून कसे व्यवहार करीत वा घरी आलेल्या भैयाला लोंगरी विकताना हिंदीत बोलून कशा प्रकारचे विनोद निर्माण करीत ह्याचे प्रात्यक्षीक बट्या गुरूजी कडूनच ऐकावे. अशाप्रकारचे विनोद ऐकवून शिष्यांचे चित्त ढळू न देता ते आम्हाला हिंदी शिकवीत असत. २०२२ साली गॅब्रीयल फार्म, राजोडी येथे झालेल्या आमच्या SSC 71 बॅचच्या ५० व्या वर्धापन दिन सोहळ्यात गुरूजींनी आपल्या भाषणात हिन्दी वरून मागील आठवणींना उजाळा देत विनोदाचे फोर आणि सिक्सर मारले होते व हास्यकल्लोळ निर्माण केला होता. त्या क्लिप वॅाट्सॲप वरती गाजल्या होत्या. त्या क्लिप तुम्ही पाहील्याच असतील. अगदी विनोदी स्वभावाचे, भारदस्त आवाजांचे, पहाडी व्यक्तीमत्वाचे आणि सर्वांना हवेहवेसे वाटणारे एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व आता अनंतात विलीन झालेले आहे. आणि म्हणूनच इथे “अश्रू माझे गळतील. “

इथे एक प्रसंग मला आवर्जून सांगावयास वाटतो. मी दुसरीत होतो बट्या गुरूजी माझे क्लासटिचर होते. त्यावेळी आमच्या वर्गात एक थोडासा उनाड मुलगा होता. एकदा जास्तच मस्ती केल्यामुळे गुरूजीचा राग अनावर झाला. त्याने माझ्या हातात छडी दिली व सांगितले कि ह्याच्या पाठीत मार. मी बेंबीच्या देठा पासुन जोर काढून त्या मुलाच्या पाठीत त्या छडीने मारलं. त्याच्या पाठीवर खांद्या पासुन कमरे पर्यंत हिरवट कलरचा वळ ( व्रण) उमटला. त्याचे काहीक मित्र माझ्यावर नाराज झाले. त्यांनी शाळेबाहेर मला मारायचा बेत आखला. पण काही कारणाने तो बेत कृतीत उतरला नाही. अगदी SSC पर्यंत ती मित्रमंडळी माझ्यावर नाराज होती. मला यातील काहीच माहीत नव्हतं. SSC नंतर एका गेटटूगेदर मध्ये मला त्यांनी त्याची कल्पना दिली. बट्या गुरूजींना आपल्या चुकीबद्दल फार मोठा पच्छाताप झाला होता. आपली चुक त्यांच्या लक्षात आली होती. आपसात त्याने ते कबूलही केलं होतं. आणि त्या प्रसंगापासुन गुरूजींनी पुन्हा कधीही छडी हातात घेतली नाही. अशा ह्या पच्छातापी गुरू समोर “कर माझे जुळती 🙏🏿.”

इथे पु.ल. चे एक वाक्य नमुद करावेसे वाटते “ज्याच्या असण्याला अर्थ असतो त्याच्या नसण्याची पोकळी हमखास जाणवते”. गुरूजीच्या असण्याला अर्थ होता.

गुरूजींची जिभ चांगली होती, आवाज भारदस्त होता, डोळे बहारदार होते, मन प्रेमळ होते, नजर तिक्ष्ण होती, वृत्ती धार्मिक होती म्हणूनच म्हणतात “जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल, आणि जर जिभ चांगली असेल तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल”. मला वाटते गुरूजीच्या जिवनाचे सार्थक आपल्याला ह्या वाक्यात नक्कीच सापडेल. ते अर्नाळा पासुन भुईगाव पर्यंत होणाऱ्या मयताच्या घरी जाऊन आपल्या भारदस्त आवाजात प्रार्थना करून भक्तिमय वातावरण निर्माण करीत. जेष्ठ नागरीकांच्या सहलीचा हिशोब ते चोख ठेवीत असत. सहलीच्या शेवटच्या दिवशी वा परतीच्या मार्गांवर असतानाच व्यवस्थित हिशोब करून जी काही देवघेव असेल ती तीथेच करून त्याच दिवशी अकाऊंट क्लोज करीत असत. हि सर्वांना प्रिय असलेली प्रथा अजूनही रुढ आहे. “अच्छे लेगोंकी सबसे बडी खासियत यह होती है कि उन्हे याद रखना नही पडता, वो याद रह जाते है।” म्हणतात ना, “सुर्य मावळताना सुद्धा आकाशात लाली पसरवतो”. बट्या गुरूजी व माझे वडील स्व. इनूस दमेल हे जेष्ठ नागरिकांच्या सहलीला एकत्र येत असत. बाबा मला सांगायचे बट्या मास्तर तुझ्याबद्दल चांगले बोलतात. ऐकूण माझा उर अभिमानाने भरून येत असे. बट्या गुरूजींना दोन्ही हातांनी लिहीण्याची कला अवगत होती. जे सहजसाध्य नव्हते. आयुष्यात चांगला गुरू मिळणं हे भाग्याचं लक्षण समजलं जातं. म्हणूनच मी मला भाग्यवान समजतो. “ बेशक अपणी मंजील तक जाना है , पर जहॅासे अपणा गुरू ना दिखे वो उचाई किस कामकी।”. आपल्यातील अनेक गुणांनी परीपक्व असणाऱ्या व शिष्यांवर अतोनात प्रेम करणाऱ्या अशा ह्या गुरूला माझा अखेरचा दंडवत!

             🙏🏿

//// पॅट्रीक डिमेलो ////

  दोनतलाव-पिपरी


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013