“वामन गुरूजी” - ७/१०/२०२३
काहीक लोक आपल्या आयुष्यात येतना खानदानी श्रीमंती बरोबरच दिर्घायुष्य व निरोगी जीवनाचा वर घेऊनच येतात. असं असूनही हि माणसे जाताना हळहळ का लावून जातात हे समजत नाही. वामन गुरूजी हे त्या पैकी एक होत. त्याचा जन्म सामवेदी कुटूंबात झाला. शनिवारी 7/10/2023 , त्यांच्या प्राणोत्क्रमणाची बातमी वॅाटस्ॲपवरील अनेक ग्रुपवर व्हायरल होऊ लागली. एक शॅाकींग न्यूजच होती. प्रथमता मन ॲक्सेप्ट करायलाच तयार होत नव्हतं. कोफराडातील यशवंतआप्पा ह्याच्या घरंदाज, नावदार, श्रीमंत व खानदानी कुटुंबातील ते होते. आप्पाशेटचे एक भाऊ भास्कर शेट ह्यांचे ते चिरंजीव होत. जवळजवळ साठ वर्षा पुर्वी नंदाखाल शाळेत तिसरी इयत्तेत शिकवणारे ते माझे गुरू होते. त्यानंतर एकदोन वर्षांनीच ते शाळा सोडून दुसरीकडे गेले. तिसरीत त्यांनी आमचा पाया मजबूत केला. ते अबोल, मितभाषी होते. निर्विकार चेहरा, सकारात्मकता व प्रशस्त मन हे केवळ वामन गुरूजीतच पाहायला मिळेल. एक साध्या, भोळ्या व प्रेमळ व्यक्तीमत्वाचा सरमिसळ असलेला गुरू आम्हाला लाभला म्हणून आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो. हातात छडी त्यांनी कधी वापरली नाही. आमच्या वर्गातील सर्व मुलांची नावे आजही त्याना ज्ञात होती. ते कधीही भेटले तर डोळ्यापुढे येणाऱ्या सर्व वर्गमित्रांची विचारपूस करीत असत. त्यात हमखास नावे म्हणजे मायकल डिक्रूज अंजेरी, संज्याव घोन्साल्विस पडई/खिवणी, पॅट्रीक कोरीया USA, पॅट्रीक डिमेलो, लुईस डिमेलो, डॅाम्णिक डिमेलो USA, मायकल तुस्कानो घोटकाल, बब्या तुस्कानो घोसाळी, स्व. फादर रेमण्ड तुस्कानो केदार, जुगा कोरीया मशादआळी, पास्कोल डिमेलो दोनतलाव हि होत. वटार गावातील जन्या मास्तराची मिसेस सुमन हि त्यांची लाडकी बहीण. सुमन सुद्धा आमच्या वर्गातच होती. तीही गुरूजी प्रमाणे प्रेमळ होती. चौथीनंतर ती के.जी. हायस्कुलला गेली. पण आजही ती भेटली की वामन गुरूजी प्रमाणेच ती सर्वांची आपुलकीने चौकशी करते. वामन गुरूजींचे सर्व गुण सुमन मधे दृष्टीपथात येतात. वामन गरूजी त्यावेळी एक चांगले कबड्डीपटू होते. त्यांचा खेळ पाहण्या सारखाच होता. त्यांचा के.जी. हायस्कुलचे चुरी मास्तर ह्याच्या विरुद्धचा सामना पाहण्यासाठी गर्दी जमत असे. वामन गुरूजी हे एक निराळेच रसायन होते. ते वृत्तीने धार्मिक होते. वटार गावातील दत्त मंदिरात ते स्वाध्याया साठी व प्रार्थनेसाठी नेहमी येत असत. स्वधर्माचा त्यांना अभिमान होता व परधर्मा विषयी आदरही त्याच्या ठायी होता. ते आमचे गुरू होते पण गुरू-शिष्यांचे नाते कंसात ठेवून ते आमच्याशी मित्रत्वानेच वागले. प्रसिध्दी पासून त्यांनी स्वताला दुर ठवले. अशा आमच्या ह्या वामन गुरूजीला आमचा अखेरचा दंडवत.
“ जीवनका मतलब तो आना और जाना है !!!!”
ॐशांती 🙏🏿
//// पॅट्रीक डिमेलो ////
“फलश्रुती “
दोनतलाव -पिपरी