“जानूदादय” (१३/०२/२०२१)
आज शनिवार, तेरा फेब्रुवारी, आपल्या दोनतलाव गावपरीवरासाठी अतिशय दु:खद दिवस. आपल्या गावातील एक मावली हरपली. आपल्या सालुकाकाची सून, पिटर उर्फ मंगाकाकाची धर्मपत्नी आणि क्लेमेंट (रमेश) डिमेलो ह्याची माता जानूदादय आपल्या लाडक्या रमेशला नव्हे तर संपूर्ण गावपरीवाराला सोडून अनंताच्या प्रवासाला निघाली. सुस्वभावी, प्रेमळ, पापभिरू, धार्मिक, मनमिळावू , अबोल, मेहनती अशा अनेक उपाधी कमी पडतील असे एक व्यक्तीमत्व आपल्यातून निघून गेले. सालुकाकाची मोठी सून म्हणून तीने गृहप्रवेश केला. चार ते पाच म्हशी हेच घरचं भांडवल. पुढे तीन भावाचं हे कुटुंब विभक्त झाले. गरीबी पाचवीला पुजलेली. आपल्या एकुलत्या एक काळजाच्या तुकड्याला (रमेशला) माहेरी ठेवून ईथे मोलमजुरी करीत आपले पोट भरत होती. त्यावेळी अडीच ते तीन रुपये दिवस मजूरीवर ती जगत होती. गावात काही ठरावीक कुटूंबे सोडली तर बाकी सर्व कुटूंबे गरीबीतच दिवस काढीत होते.
मंगाकाका अकाली निघून गेले. केवळ रमेशला मोठं करावं ह्या ध्येयावरच ती जगत होती. मामाकडे शिक्षण पूर्ण करून तो आईकडे आला व लवकरच गावात रूळला. पुढे शिक्षकी पेशा पत्करून कामाला लागला आणि आपल्या प्रिय आईची मनोभावे सेवा करू लागला. रमेशने कुटुंबीयां समवेत आपल्या घराचे काम पूर्ण करून आईसाठी एक सुस्वभावी सून आणली. कष्टाळू जीवन जगलेल्या आईचं पुढील आयुष्य सुखात जावं ह्या भावनेनं तो तिच्यावर प्रेम करीत होता. त्यातच तीला डायबेटिस ह्या दुर्धर आजाराने ग्रासले. रमेश प्रमाणे रमेशच्या मिसेसने सुध्दा आपल्या सासूवर अतोनात प्रेम केले व नोकरी सोडून जमेल तेवढी सेवा केली. एकटे पणाचे जीवन जगत जगत सून व दोन नातवंडा सहीत तीचे एक पंचकोणी कुटुंब तयार झालं. आपल्या नातवाला SSC ला पोहोचल्याचा आनंद घेऊन आज ही मावली मंद ज्योती सारखी हळूहळू विझली.
रमेश, खरंच तुझी आई म्हणजे मंदीराचा कळस, संस्काराचं भंडार, देवाचं प्रतिरूप.
रमेश, हे जे काही मी लिहीले आहे ते खरे आहे व मी त्याचा एक साक्षी आहे. अशी माऊली सारखी आई लाभणे हे एक भाग्यच आहे.
अशा ह्या मोठीकाकयला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏿🙏🏿
----समाप्त---/