भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो
तेरे एक बूॅंद के प्यासे हम
मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी च्या भर दुपारी अतिशय दुःखद, अविश्वसनीय परंतु दुर्दैवाने खरी असलेली असलेली एक बातमी वाॅटसअॅपच्या सर्व ग्रुप वर येऊन धडकली आणि सगळ्यांची झोप उडाली. सगळीकडे अंधारून आले. वाटा निस्तेज झाल्या आणि मन सुन्न झाले. पॅट्रिक तुझ्या जाण्याची ती बातमी होती. आदल्याच दिवशी तू हाॅसपिटल मधून घरी आला होतास हे समजले. मुळात तू रूटीन चेकअप साठी तुमच्या बी. ए. आर. सी. च्या हाॅसपिटल मधे गेला होतास. पत्नी वेरोनिका तुझ्या बरोबर येत होती परंतु तू तिला मना केले. तुझ्या मनात काय द्वंद्व चालले होते हे कोणाला समजले नाही. परंतु तुझा प्रवास क्षणाक्षणाला मॄत्यू च्या समीप चालला होता. प्रत्येक जिवंत माणसाचा प्रवास असाच असतो. तुला हाका ऐकू येत होत्या. मला आता गेले पाहिजे हे तुझ्या मनाने ठरविले होते. तुझी पूर्ण तयारी झाली होती. जिथून आलो तिथेच जाणे म्हणजे मॄत्यू. म्हणून तो कधी अ सुंदर असू शकत नाही. ज्याच्या वर प्रेम केले, ज्याच्या इच्छेप्रमाणे वागलो, ज्याचा ध्यास घेतला तेथ पर्यंत जाणे म्हणजे मॄत्यू असतो. पॅट्रिक सीमा चित्रपटातील तू एक प्यार का सागर है हे तुझं आवडतं गीत होतं. अनेकदा ते तू गुणगुणायचा. त्या सागरात विलीन होण्यासाठी तू निघून गेलास. पंचमहाभूतात विलीन होणे म्हणजे मॄत्यू.
पॅट्रिक, मागच्या महिन्यात तू विएटनामला सहलीसाठी जाऊन आलास. तेथे तुझ्या लग्नचा वाढदिवस तुमच्या पिकनिक ग्रुपने साजरा केला. तू नेहमी कोणत्याही सेलिब्रेशन पासून दूर असायचा. बंधू तरुणपणात गेल्याचं दुःख तुझ्या अंतःकरणात खोलवर होतं.
पॅट्रिक तू अतिशय शांत, विनम्र, मनमिळाऊ, प्रेमळ, इतरांना सहकार्य करणारा व मिषकिल स्वभावाचा होतास. ७१ च्या बॅच मधील पहिल्या पाच सहा मुलांमध्ये तू नेहमी असायचा. इंग्रजी व गणित विषयात तुला चांगली गती होती. अलिकडे तुझ्या लेखन कौशल्याची आम्हाला नव्याने ओळख झाली. सहलीचे वर्णन, आपल्या घराण्याचा व गावाचा इतिहास, एखाद्या आवडलेल्या माणसाचे शब्दचित्र तू तुझ्या शब्द सामर्थ्याने जिवंत उभे करायचा. असंच एक शब्दचित्र तुझ्या मागच्या सहलीमधे भेटलेल्या एका भगिनीचे तू रेखाटले होते. ते खूप वाचनीय होते. पॅट्रिक तू लिहिलेस तसेच इतरांच्या लेखनाचे कौतुकही तू केलेस. पॅट्रिक कोरिया यांना तू लेखनास प्रवॄत केलेस. त्याच्या लेखनाला प्रोत्साहन दिले.
पॅट्रिक तू आपल्या कुटुंबात, गावात, मित्र मंडळीत खूप रमलास . वर्ग मित्रांच्या अनेक कार्यक्रमात तू आयोजन नियोजन करण्यात अग्रेसर राहिलास. तू गप्पा गोष्टी, हास्य विनोदात रमलास परंतु खाण्यापिण्याच्या बाबतीत तू खूप काळजी घेतली. साध्या कोल्ड्रिंक्सलाही तू कधी शिवला नाहीस. देह हे देवाचे मंदिर असते ते तू नेहमी पवित्र राखले. म्हणून तुझ्या बायपास शस्त्रक्रियेनंतर खूप वर्षे आनंदाने जगता आले. त्यासाठी देवाला धन्यवाद दयायला हवेत.
प्रभावी, तेजस्वीनी आणि वैभवी या तुझ्या तीन मुली म्हणजे तुझं प्रभावी आणि तेजस्वी असं वैभव आहे. तुझ्या तीनही मुली यु. एस. मध्ये आहेत. तू वेरोनसह तेथे गेलास म्हणजे वर्ष सहा महिने वास्तव्य करायचा. तेथे तू खूप रमायचा . येथे आलास की मित्रमंडळीत हरवून जायचा.
पॅट्रिक तुझ्या गीत संगीताच्या आवडीमुळे तुझ्या जगण्या वागण्यात लय आणि ताल होता. त्यामुळे तुझं जगणं कधी बेसूर झालं नाही. आपण जसे जगतो, वागतो, विचार करतो तसं आपलं दिसणं असतं. तसं आपलं व्यक्तिमत्त्व घडत असतं. तू आपल्या आयुष्यात नेहमी गरीबांचा विचार केला म्हणून तुझं जगणं सुंदर झालं. जगणं म्हणजे प्रेम करणं. फक्त प्रेम करणं. पॅट्रिक तू तुझ्या सहवासात आलेल्या प्रत्येकावर प्रेम केले. तुझी पत्नी, मुली व नातवंडावर प्रेम केले तू आध्यात्मिक वॄततीचा होतास. ईश्वराची आपल्या कडून काय अपेक्षा आहे हे तुला समजले होते. म्हणून जाता जाता तू अवयव दान करून गेलास. आपल्या देहाचा थोडा जरी फायदा गरजवंताला झाला यापेक्षा अधिक पुण्यप्रद काय? या तुझ्या अवयव दानाने तुझं जगणं अधिक अर्थपूर्ण झालं.
मागील काही दिवसात तुला नक्कीच दुख त्रासाला सामोरे जावे लागले. आणि ते सहन करताना तू अचानक सर्वांचा निरोप घेतलास.
आता दुःख संपले. अश्रू संपले. मागे उरल्या आहेत तुझ्या गोड आठवणी आणि तुझा हसरा चेहरा. तो कायम आमच्या स्मरणात राहील.
तुझ्या प्रेमळ समॄतीस आमची भावपूर्ण श्रध्दांजली
अंतोन परेरा
आणि वर्ग मित्र
७१ बॅच
—--------------------------------------------
पॅट्रीकमामा !
नाती जपणारे , एक अद्वीतीय व असामान्य व्यक्तीमत्व !
प्रत्येक नातं पराकोटीच्या निस्वार्थीपणे जपले व फुलवीले.
जणूकाही, सर्व नातेवाईकांचे त्याच्या जीवनात असणे हेच त्याचे जगणे होते .
इतरांसाठी जगता जगता तो स्वतःचे आयुष्य जगला. तो डायबेटीक आणि हार्ट पेशन्ट असुनही त्याचा बाऊ न करता तो अविश्रांत जगभर फीरला.
त्याच्याकडे असामान्य कुवत होती.
असे म्हणतात की देव मन बघून धन देतो व कुवत बघून अडचणी देतो. पॅट्रीक समोर असामान्य अडचणी आल्या पण
अडचण बघून डगबघला नाही, रडला नाही , कुणाला दोष दिला नाही , कोण काय करतो हेही पाहीले नाही तर आलेल्या प्रत्येक अडचणीचे त्याने संधी म्हणून स्वागतच केले. आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं. कुठल्याच बाबतीत कुणावरही कधीही अवलंबून राहीला नाही कींवा काही अपेक्षाही ठेवल्या नाहीत . जो आला त्याच्या सह व जो न आला त्याचे विना तो पुढे गेला. अपघातात सापडलेला भाऊ व त्याचं कुटूंब, मुलाच्या अपघातामुळे खचलेले वयोवृध्द वडील आणि डायाबेटीस ग्रस्त आई ह्यांची त्याने केलेली सेवा अद्वीतीय, आणि असामान्यच !
पॅट्रीकला तीन मुली असल्यामुळे त्याच्या जीजीला त्याची चींता होती पण त्याला त्याची चींता नव्हती. त्याची काळजी देवाला होती . आज त्याच्या तीनही मुली ऊत्तम शिक्षण घेऊन अमेरीकेत स्थायीक झालेल्या आहेत . तीन मुली असणे हे सर्वसामान्यासाठी अडचणीचे होते पण त्याच्यासाठी ही एक संधी होती ज्याचे त्याने सोनं केलं.
ह्या सर्व प्रवासात सक्षम आणि समर्थपणे त्याला सोबत करणाऱ्या त्याच्या अर्धांगीनीला सलाम !
पॅट्रीक, ॲाप्टीमम (Optimum) जगला, जीवनाने पथ्य पाळण्याबाबत त्याची परीक्षाच घेतली असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही .फक्त जगण्यापुरता लागेल इतकही त्याने खाल्ले नाही. ज्याप्रमाणे मेणबत्ती संपुर्ण मेण व वात संपल्यानंतर जळायला काही उरले नाही म्हणून विझते त्याप्रमाणे त्याला मरण आले. इतरांनी बोध घ्यावा असे आयुष्य तो जगला, त्याच्या जीवनातून आपण घेतलेला बोध हीच त्याला खरी श्रध्दांजली ! देव त्याच्या आत्म्यास शांती देवो आणि चिरंतन तेजाने प्रभावीत करो ! आमेन.
विल्सन आल्मेडा ,निर्मळ.
—--------------------------------------------
स्वर्गवासी पात्रीस आमच्या कळसू परिवाराचे आप्पां, अभ्यासू,चिकित्सक ,हेोशी व्यक्ती .परीयटनाची फार आवड.नेहमी वेरोणबरोबर गरुलाही घेऊन जात असत.पण आप्पा आज तुम्ही एकटेच आयोजन-नियोजन करून का निघून गेलात?तुमची भ्रमती पुरी झाली काय? आप्पा आपलया समाजात किंवा गावपरीवारात बातमीविषयी तुम्ही लिहीत असत.आपलया गावातील काही व्यक्ती व घटनाविषयी बरेच काही लिहले, तो अमोल ठेवा आपलया तरूण पिढीसाठी संग्रही केलात.आपलया कळसू परिवाराची पाच पिढ्यांना वंशावळ लिहिलीत. तो सगळा Data collection साठी तुम्ही अपार मेहनत घेतली.त्यासाठी तुम्ही खूप लोकाशी संपर्क साधला.हे कळसू परिवारासाठी फार मोठा ठेवा निर्माण केलात.आमही तुमचे ऋणी आहोत.
आप्पा तुमचं मिश्किल हसणे आणि त्याचबरोबर विनोदी बोलणे त्यामुळे समोरचया माणसाचं मन तुम्ही जिंकत असत.तुम्ही लहानाबरोबर लहानासारखे तर वृध्दाबरोबर आपुलकीने वागत असत.तुमच्या अचानक जाण्याने आपलया परिवारात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.तुम्हाला स्वर्गीय सुख शांती लाभो हीच त्या दयाधनाकडे पार्थना
—--------------------------------------------
*पॅट़ीक डिमेलो*
*निघाले देवाघरी*
(श्रद्धांजली जरूर वाचा)
*माझा प्रेरणास्रोत गेला*
*शब्दाचा पुजारी थांबला*
*कुशीत भूमातेच्या विसावला*
*धरणी मातेशी एकरुप झाला*
शांती शांती शांती
लिहिण्यास अत्यंत दुःख होत आहे की, नंदाखाल दोनतलाव येथील एक जेष्ठ नागरिक,भाभा अनु संशोधन केंद्र मधून निवृत्त अधिकारी, श्री पॅट़ीक डिमेलो यांच दि १३.२.२०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६९ वर्षे होते.
पॅट़ीक यांच्या अचानक मृत्युच्या बातमीने मन खूपच विचलित झाले .गंभीर आजारपणाची कुठलीच चर्चा परिसरात नसल्याने बहुतांशी लोकांना त्याच्या अशा अचानक जाण्या ने खूपच वाईट वाटले ,आणि हा हा म्हणता सर्वांची पाऊले नंदाखाल दोनतलाव येथे फिरकू लागली. पॅट़ीक हा मला नंदाखाल शाळेत एक वर्ष जेष्ठ होता. तो १९७०-७१ला SSCला तर मी १९७१-७२ लाSSC झालो. त्या मुळे शाळेत शिकत असताना घनिष्ट मैत्री जरी नसली तरी दाट परिचयाला व अधून मधून एकमेकांना हव्या असलेल्या मैत्रीच्या सहवासाला, सोबतीला आम्ही कधीच मुकलो नाही शाळेत असतानाअभ्यासाबरोबरच अनेक मैदानी खेळातही तो खूपच पारंगत होता.इत्तर विषया प्रमाणेच मातृभाषा मराठी हा त्याचा आवडता विषय होता.
नवदिप , प्रेरणा, नंदादीप इत्यादी अंकात तो हमखास लिहायचा. त्या काळी वेळोवेळी वरील अंकात त्याची आवर्जून हजेरी असायची.त्यांची लिखाणाची गुणवत्ता आणि शैली एक वेगळ्या प्रकारची व अलंकारिक शब्दात असून शेवट पर्यंत त्याने ती जपून ठेवली होती. SSC नंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने गेले, प्रत्येकाच्या वाटा, मार्ग भिन्न भिन्न झाले, शिक्षण, नोकरी, संसार, मुलांच संगोपन, मार्ग दर्शन ह्या मुळे दोन भेटीत खूप अंतर जरी झाले तरीही परिचय, जिव्हाळा आपुलकीने मिळणारे प्रेम यात कुठलाही दुरावा निर्माण झाला नाही, उलट जेवढं अंतर वाढले तेवढच प्रेम जवळीकता देखील वाढवण्याचं काम आम्हा दोघाकडून झाले.
अलिकडेच र-व. येलीस डिमेलो रा. दोनतलाव यांच्या विषयी What's app वर लिहिलेली उत्कृष्ट श्रद्धांजली विषयी मी त्याला अभिप्राय दिल्या बद्दल त्यालाही फार छान वाटले. एखाद्याचे व्यक्तिचित्रण वर्णन ,श्रदधाजली च्या माध्यमातून तो इतका हुबेहूब करायचा, की जणु काही ती व्यक्ती समोर दिसत आहे.
दोनतलाव,विसरोडी गावपरिवार बद्दल लिहलेल्या जुनी घरे,कौटुंबिक माहिती व जुन्या स्मृती विषयी मी त्याचं अभिनंदन करून मनोमनी धन्यवाद दिले. हा त्यांचा लेख म्हणजे ५०वर्षापूर्वी च्या स्मृतीला दिलेला एक उतम उजाळा होता, स्मरण शक्तीला दिलेलं आव्हान होतं, व त्या कसोटीमधे पॅट़ीक पूर्णपणे यशस्वी झाला होता हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते .आपल्या गाव पातळीवरचा तो एक छोटासा इतिहास कार होता, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही असे मला वाटते. माणसाचे शरीर हे माती आहे व शेवटी मातीतच मिळणार आहे,*(We are the dust, and to the dust we shall return) याची आठवण देणाऱ्या राखेच्या बुधवारच्या(Ash Wednesday) पूर्व संध्येला पॅट़ीक ने भर संसारातून, इहलोकीचा निरोप घेणे, म्हणजेच ईश्वरासमोर पूर्ण पणे अंतःकरणातून समेट करून स्वीकारलेली शरणागती आहे*, असे माझं भाविक मन मला खुणावत आहे*.
( *प्रतिवर्षी राखेच्या बुधवारी, काळजाचा ठाव घेणारी, एका चिंतनशील गीताची, बासरीवर वाजवलेली एक ह्रदयस्पर्शी लिंक सोबत देत आहे. दुःखग्रस्त व इतर भाविकांनी ती जरुर ऐकावी*)
*पॅट़ीक आणि माझं नातं म्हणजे एकमेकांना ऊर्जा पुरवणे. आम्ही दोघे एकमेकांचे ऊर्जास्रोत होतो*.
आमचे कुण्यात **ब्रिटोसर**यांच्या विषयी मी लिहीलेल्या जुन्या काळातील अविस्मरणीय नाते सबंधाना उजाळा देणारी श्रद्धांजली वाचून मला मनापासून शाबासकीची दाद दिली, माझ्या साठी ती एक कायमस्वरूपी प्रेरणास्रोत व पोचपावती होती हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.* दुसऱ्याच्या योग्य व चांगल्या कामाची आपापल्या परीने दखल घेऊन सबंधित व्यक्तीला प्रोत्साहित करणं हा कौतुकास्पद दुर्मिळ दिसणारा गुण त्याच्या ठायी वस्तीला होता*.
*निसर्गाने मानवाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. फक्त दोन अधिकार त्याने स्वतः कडे ठेवले आहेत, ते म्हणजे जिवन-मृत्यु , आणि नैसर्गिक आपत्ती. म्हणूनच ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या आपण परमेश्वरा वर सोपवतो. जिवन मृत्युच्या ह्या खेळाचा अनुभव असाच वर्षानुवर्षे चालूच राहणार आहे* .
*आपलं दुःख हलकं व्हावं,हया दुःखाला आशेचा सकारात्मक विचार मिळावा,दैवी सांत्वन व्हावे म्हणूनच पवित्र बायबल वर आधारीत देऊळ मातेची खालील शिकवण आपलं सांत्वन करील*.
*मृत्यु हा जीवनाचा शेवट नाही तर सर्वकालीन जीवनाची पहाट आहे*
*Death is not the end of life ,*
*It is the Passage of* *Everlasting Life*.
*ईश्वरावर नितांत श्रद्धा असणारा ,आपल्या शब्दावर नितांत प्रेम करणाराअसा हा शब्दाचा पुजारी, Patrick D'mello निघाले देवाघरी , शाश्वत जीवनाच्या न संपणाऱ्या प्रवासाला,अनंताच्या वाटेवरून, परमेश्वराच्या भेटीला,श्रद्धेच्या रहस्याचा (Mystery of Faith) अभ्यास करण्यासाठी Patrick निघाले देवाघरी*
*त्याच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभो हीच परमेश्वरा कडे विनम्रपणे प्रार्थना* .
.
*लिहता लिहिता*: *स्व. पॅट़ीक डिमेलो ह्यांनी मृत्युनंतर त्वचादान आणि नेत्रदान केले आहे* .
*विन्सेंट आगुसतीन दिब्रिटो*
*नानभाट*
*निवृत्त,मुंबई. महानगर पालिका*
*SSC Batch1971-72*
*8149595880*
—--------------------------------------------
Written by Appa, narrated by Lynette
।।श्रद्धांजली ।।
स्व. पॅट्रिक इग्नेशियस डिमेलो
स्वतःसाठी जगलास तर मेलास , दुसऱ्यासाठी मेलास तर खरा जगलास या प्रभुवचनानुसार गेली ६९ वर्षे जीवनप्रवास करणारे स्व. पॅट्रिक इग्नेशियस डिमेलो म्हणजेच आम्हा कुटुंबीयांचे आदरणीय आप्पा ह्यांचा पृथ्वीतलावरील जीवनप्रवास मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी सुमारे १ वाजता अचानक आणि अकाली थांबला आणि ते अनपेक्षितपणे अनंताच्या यात्रेला निघून गेले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्याकरिता तसेच कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जमलेल्या आपल्या सर्वांचे स्वागत.
आमच्या आप्पांचे जीवन म्हणजे एक धगधगती संघर्षयात्रा ! त्यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षावर मात करून जगण्याची एक प्रेरणादायी यशोगाथा आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ६मे १९५४ रोजी आमच्या आप्पांनी दोनतलाव गावातील सधन अशा दमेल कुटुंबात स्व. इग्नेशियस आणि स्व. रोजीबाई डिमेलो या मातापित्याच्या पोटी जन्म घेतला. तत्कालीन प्रतिष्ठित व्यक्ती स्व. टोकरदुज्याचे ते नातू ! गोरेगोमटे रुप , लाघवी स्वभाव त्यामुळे सर्वांना हवेहवेसे वाटणाऱ्या आमच्या आप्पांचे बालपण मोठ्या परिवारातील मोठ्या गोतावळ्यात अगदी लाडाकोडात गेले. बी ए पर्यंतचे शिक्षण त्यांनी अगदी विनासायास आणि उत्तमरीत्या पूर्ण केले. यथावकाश आप्पांना १९७९ BARC या सुप्रसिद्ध संशोधन संस्थेत नोकरी मिळाली. वक्तशीरपणा , नियमितपणा , कार्यनिष्ठा , कर्तव्यतत्परता आणि सचोटी या अंगभूत मूल्यांच्या बळावर ते नोकरीत पर्मनंट तर झालेच पण त्यांनी त्यांचे असे एक स्थान निर्माण केले. Duty first या त्यांच्या तत्त्वामुळे सहकारी आणि वरिष्ठांच्या विश्वासाला ते पात्र ठरले.
२० जानेवारी १९८५ या वर्षी मिनेज परिवारातील स्व. मेरी आणि श्री . सायमन उर्फ शमन मिनेज या प्रतिष्ठित कुटुंबातील वेरोणिका हिच्याशी आमचे आप्पा विवाहबद्ध झाले आणि त्यांच्या अत्यंत सुंदर आणि आदर्श अशा प्रपंचाला सुरुवात झाली. एकमेकांस अनुरूप असलेल्या आप्पा आईचं वैवाहिक जीवन म्हणजे अक्षरशः राजाराणीचा संसार होता. ज्येष्ठ भगिनी सौ. आग्नेस आणि त्यांच्यासह जेरोम आणि मॅथ्यू उर्फ मतू या तीन भावंडात ज्येष्ठ असलेल्या आमच्या आप्पांनी ज्येष्ठ बंधूची , कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आणि भूमिका मोठ्या निष्ठेने पार पाडली.
आपल्या तीन कन्या आणि भावांची चार अपत्ये यामध्ये त्यांनी कधीच आपपरभाव केला नाही. सर्वांना सारख्याच मायेने त्यांनी वाढवले आणि घडवले. दि. जुलै १९८८ रोजी आमच्या कुटुंबावर एक फार मोठे संकट कोसळले. आमच्या जूरणअंकल मोटरसायकलच्या अपघातातून तात्पुरते वाचले , परंतु ते कायमचे बेशुद्धावस्थेत गेले. वृद्धत्वाकडे झुकलेल्या आईवडिलांच्या मदतीला ज्येष्ठ सुपुत्र या नात्याने आमचे आप्पा पुढे सरसावले. त्यांनी सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. तेथून त्यांच्या संघर्षयात्रेला सुरुवात झाली. उत्पन्नाचे मुख्य साधन असलेली नोकरी , जूरणवर उपचार आणि कुटुंबाची जबाबदारी या ओझ्याखाली सापडलेल्या आमच्या आप्पांनी या सर्व आपत्तींना मोठ्या धीराने तोंड दिले. मुंबईतील सर्व नामवंत हॅास्पीटलमध्ये जूरणवर उपचार करून त्याला प्राणसंकटातून वाचविण्यासाठी आप्पांनी जिवाचे रान केले , रात्रीचे दिवस केले आणि ते पैशांचे पाणी करत होते. तर दुसरीकडे आपल्या कुटुंबालाही ते सावरत होते. विशेषतः आपली भावजय गरू आणि तिची दोन्ही लहान मुलं राजन( दादा ) आणि बंधू यांच्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. प्रसंगी त्यांनी आपल्या पोटच्या मुलींकडे दुर्लक्ष केले पण जूरणच्या कुटुंबाला काहीही कमी पडू दिले नाही. आपल्या भावाला जूरणला आपण वाचवू शकलो नाही याचे शल्य त्याच्या हृदयाला आयुष्यभर टोचत राहिले. त्यातूनच हृदयरोग आणि डायबेटिस या भयंकर शत्रूंनी बेसावधपणे त्यांच्या शरीरात शिरकाव करून कायमचे ठाण मांडले. २००८ साली त्यांच्यावर बायपास सर्जरी करावी लागली. तथापि शारीरिक व्याधींपुढे शरणागती न पत्करता अधिक धैर्याने आणि अधिक खंबीरपणे ते परिस्थितीशी झुंज देत राहिले. जूरणच्या निधनानंतर आईवडिलांच्या आजारपणाची मालिका सुरू झाली.
त्यांचे औषधोपचार , प्रभावी , तेजस्वी आणि वैभवी या तिन्ही लाडक्या मुलींचे संगोपन , त्यांचे इंजिनियरिंगपर्यंतचे उच्च शिक्षण पुढे त्यांचे विवाह , शिवाय दोन्ही भावांच्या संसारांनाही हातभार हे सर्व करताना ते अक्षरशः मेटाकुटीला येत असत. पण त्यांनी कधी हिंमत सोडली नाही , चेहऱ्यावरचं स्मितहास्य कधी लोपू दिलं नाही. एकट्याच्या पगारावर सारं निभवताना त्यांची नक्कीच दमछाक झाली असेल पण त्यांनी कधी कोणाकडे हात पसरला नाही की लाचारी पत्करली नाही. अत्यंत काटकसरीने आहे त्यात समाधान मानून ते आपली प्रिय पत्नी वेरोणिका उर्फ वेरॅाणच्या सहाय्याने संसाराचा गाडा हाकीत राहिले. यात त्यांच्या बि ए आर सी हॅास्पिटलने त्यांना खूप सहकार्य केले. शिवाय अत्यंत नम्र आणि सुज्ञ मुलींनी त्यांना तितकीच मोलाची साथ दिली. कपडे , खाणेपिणे याबाबत कोणतेही हट्ट न करता आहे त्यात आनंद मानून त्यांनी त्यांचे सारे लक्ष शिक्षणावर केंद्रित केले. याविषयी आमचे आप्पा खूप समाधानी होते. त्यांनी आणि गरूवहिनींनी आपली सुखदुःखे दुय्यम मानून वृद्ध व आजारी आईवडिलांची अपार सेवा करून सेवेचा एक आदर्श वस्तुपाठ समाजापुढे ठेवला. खरोखरच दुःख पेलावे कसे आणि पुन्हा जगावे कसे हे आमच्या आप्पांकडूनच शिकावे.
आमच्या आप्पांचा स्वभाव चारचौघांपेक्षा थोडा वेगळाच होता. ते सगळ्यात असूनही ते त्यांचं वेगळं स्वत्व , त्यांची अस्मिता कायम जोपासत आले.
रंगुनी रंगात साऱ्या , रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा
असा त्यांचा स्वतंत्र बाणा होता. त्यांनी एकदा घेतलेला कोणताही निर्णय कोणाच्या सांगण्यावरून कधीच बदलला नाही. निश्चयाचा महामेरू म्हणावं असे ते अत्यंत निग्रही होते. स्वतंत्र बुद्धी आणि स्वतंत्र विचार यामध्ये त्यांनी कधी तडजोड केली नाही. आत्मचिंतन हा त्यांचा आणखी एक विशेष गुण होता. त्या चिंतनाला अफाट वाचनाची जोड होती. वाचन आणि चिंतन यातून हाती लागलेल्या मोत्यांची त्यांनी लेखनाद्वारे मुक्त हस्ताने उधळण केली. निवृत्तीनंतर तर त्यांनी लेखनाचा छंद बऱ्यापैकी जोपासला होता. त्यांच्या लेखनाला संशोधनाचा आणि इतिहासाचा आधार असल्यामुळे त्यांचे लेखन वाचकांच्या पसंतीला उतरले होते. ज्येष्ठ नागरिकांमधील त्यांचा वावर सर्वांना हवाहवासा वाटत असे. अलीकडे तर त्यांचा गोतावळा खूपच वाढत चालला होता. त्यांनाही माणसात राहायला आवडत असे. या जन्मावर आणि या जगण्यावर प्रेम करण्याचा त्यांचा स्वभाव सर्वांनाच ठाऊक होता.
त्यामुळे पर्यटनाची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही. देश विदेशातील सहलीत त्यांची पंचेंद्रिये कायम जागृत असत. पर्यटन कसं करावं हेही त्यांच्याकडून शिकावं. आपल्या तिन्ही मुलींचे भरले संसार पाहण्यासाठी , त्यांना हातभार लावण्यासाठी ते मोठ्या आनंदाने अमेरिकेला जात असत आणि तृप्त मनाने परतत असत. आपल्या तिन्ही कन्या , टॅानी , धीरज आणि नील. हे तिन्ही पुत्रवत जावई आणि पाच गोंडस नातवंडे हे त्यांच्यासाठी अमोल धन होते , जीव की प्राण होते. त्यांच्याविषयीचा अभिमान त्यांच्या डोळ्यात कायम वाचायला मिळत असे. त्यांच्यासाठी जगण्याची त्यांची खूप इच्छा होती. लवकरच स्वतः ची सत्तरी आणि त्यांच्या लाडक्या वेरोणची साठी धुमधडाक्यात करण्याचे मनोरथ ते मनात रचत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. देवाची योजना त्यांच्या योजनेहून वेगळी होती. दातांच्या ट्रिटमेंटसाठी चेंबूरला बि ए आर सी हॅास्पिटलमध्ये ते जातात काय , तिथे त्यांना माईल्ड स्ट्रोक येतो काय आणि हे सारं असह्य होऊन त्यांचं हृदय अचानक थांबतं काय सर्वच अकल्पित, अनपेक्षित आणि स्वीकारण्याच्या पलीकडचे !
अरे जगणं मरणं एका लालाचे अंतर ह्याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे आप्पांचं मरण ! आम्हा सर्वांना , विशेषतः परदेशी असलेल्या तिन्ही मुली व त्यांच्या कुटुंबीयांना हादरवून टाकणारं ! दुःखाचा प्रचंड अनुभव देणारं. तथापि परमेश्वराने आमच्या आप्पांना ६९ वर्षांचं चांगलं आयुष्य दिलं अनेक वरदानांबरोबरच आयुष्य अर्थपूर्ण बनवणाऱ्या बहुमोल देणग्या दिल्याबद्दल देवाला धन्यवाद ! परमेश्वराने त्यांच्या सर्व प्रमादांची क्षमा करून त्यांची सेवाभावी सत्कृत्ये जमेस धरून त्यांना स्वर्गराज्यात समावेश करावा तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीचे , मुलाबाळांचे आणि कुटुंबांचे सांत्वन करावे , त्यांचा सांभाळ करावा हीच त्या दयाघनाकडे नम्र प्रार्थना !
आमचे आप्पा जाताना जणू सांगून गेले आहेत ,
राहो बनून आकाश माझा शेवटचा श्वास
मनामनात उरावा फक्त माझ्या प्रेमाचा सुवास , फक्त माझ्या प्रेमाचा सुवास
आमच्या लाडक्या आप्पांना हीच आमच्या कुटुंबाच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
—--------------------------------------------
Vietnam group
अश्रूंची अश्रूंचीबांध फुटती हृदयी येते भरून जाल इतक्या लवकर निघून नव्हते स्वप्निले कधी कुणी... प्रिय पॅट्रिक ...दादा डिसेंबर महिना उगवला आणि मनात आले जानेवारी महिन्यात आपण व्हिएतनाम टूर ला जाऊया. रोबिनला फोन केला आणि त्यानेही तयारी दर्शविली यायची तयारी करशील परंतु मेंबर कसे जमतील हा प्रश्न होता. आम्ही सहा जण तयार होतो. काय दिवसांनी रॉबिन बोलला की आपला तीस जणांचा ग्रुप तयार झाला कोण कोण आहेत विचारल्यानंतर पहिले नाव पॅट्रिक दादा आणि त्याचे सहा-सात मेंबर..पॅट्रिक दादाला फिरायची खूप हौस आहे जिथे जिथे जातो तिथे सगळी माहिती लिहून काढतो प्रत्येक ठिकाण आवडीने बघतो वगैरे वगैरे माहिती दादा बद्दल मिळाली. आणि जे काही ऐकले होते ते खरे आहे याची टूर दरम्यान आम्हाला प्रचिती आली.. शांत आणि मिश्किल स्वभावाच्या दादानी पिकनिक दरम्यान खूप सारे जोक्स सांगितले गाणी ऐकवली. पिकनिकचे आठ दिवस स्वप्नातल्या दुनियेसारखे भरकन निघून गेले परंतु जन्मभराच्या आठवणी मात्र ठेवून गेले. दादाची वेडिंग एनिवर्सरी आम्ही खूप हाऊसमौजेन साजरी केली. वेरॉन बाय नटली थटली आम्ही तुमची वरात काढली वराति समोर नाचलो किती आनंदात दिसत होता तुम्ही दोघे..कारण असे इकण्यात होते की जुरान दादाचे निधन झाल्यानंतर पॅट्रिक दादाने कधी लग्नाचा वाढदिवस वाढ दिवस साजरा केलl नाही
आपला प्रवास खूपच छान झाला..आपण सर्वजण सुखरूप घरी परतलो पुदच्या पिकनिक ची स्वप्ने रंगवत..परत लवकरच भेटू असे.म्हणत..परंतु तुझ्या बद्दल नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दातांच्या उपचारासाठी तू BARC hospital मध्ये ऍडमिट होतोस काय..पुढे ICU, nantar सुखरूप पणे तुझा डिस्चार्ज..घरी परतल्यानंर तो कर्दनकाळ.. सगळेच कसे कल्पणपलिकडले.. दादा तुझी आमची ओळख काही दिवसाची..आपल्या ग्रूप मधील काही मेंबर तुझे पिकनिक पार्टनर..परंतु आमच्यासाठी तुझा सहवास नवीन आणि सुंदर..तुला डिस्चार्ज दिल्यानंतर तुझ्याकडे यायचे राहूनच गेले..खूप गप्पा मारायच्या होत्या..पुढच्या पिकनिक ची स्वप्ने रंगवायची होती..परंतु देवाने तुझ्यासाठी एक वेगळेच पिकनिक स्थळ शोधून ठेवले होते..तू अनंताच्या प्रवासाला निघाला आहेस..परमेश्र्वराकडे तुझ्या कुटुंबासाठी विशेष करून तुझी लाडकी पत्नी आमची वेरॉन बाय तुझ्या तिन्ही मुली, जावई, नातवंडे जे सगळे परदेशात आहेत तुझा भाऊ, बहीण आणि संपूर्ण कुटुंब सुखी समाधानी राहावे म्हणून प्रभुकडे विनंती कर.. शेवटी दादा तुझ्या लाडक्या कन्यांना एवढेच सांगेन, वडील कधीच मरत नाहीत आपल्या लेकराच्या संस्कारात हे जिवंत आहेत .जरी शरीर पंचतत्वात विलीन झाले तरी ते तुमच्या सर्व सुख दुःखात उपस्थित आहेत. वडील कधीच मरत नाहीत ते आपल्या आठवणीत अमर आहेत..दादा, तुझ्या आत्म्याला शांती.लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना.. तुझाच व्हिएतनाम ग्रूप..
—--------------------------------------------
प्रिय पॅट्रिक आपण व्हिएतनाम सहलीवरून 26जानेवारीच्या पहाटे घरी पोहोचलो, त्यानंतर 31जानेवारीला आपली भेट झाली,दोन दिवसांनी रूटीन चेकअप साठी हाॅस्पीटल मध्ये गेलास आणि दाखल झालास औषधोपचार सुरू झाले, सोमवारी हाॅस्पीटल मधून डिस्चार्ज मिळाला आणि रात्री घरी आलास, दुसऱ्या दिवशी मंगळवारी तुझ्या निधनाची दुःखद
वाईट बातमी आली.
आपली एस् .एस्.सी.1971बॅच ग्रुपसाठी इतर सहकार्यासोबत मेहनत घेतली,2011साली बॅचची चाळीशी निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रम झाला, त्यानंतर हळूहळू व्हाॅट्अप ग्रुप तयार झाला पुढे आपला ग्रुपचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम पार पडला , दरम्यान दोन तीन कायऀक्रम झाले त्या निमित्ताने आपण भेटत होतो, आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकत्र येणार होतो पण ध्यानीमनी नसताना तुला अचानक अखेरचा निरोप घ्यावा लागला , पॅट्रिक आपण तीन चार सहली एकत्र केल्या,तुझा आणि वेरोनचा सहभाग आणि सहवास आनंददायी होता, व्हिएतनाम सहलीमध्ये 20जानेवारीला तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता, याबद्दल तू काही बोलला नाही,पण तुझ्या मुलास मान प्रेमळ पुतण्याने राॅबिनला कल्पना दिली,अंकलची वेडिंग अॅनिव्हसऀरी साजरी करा, तुझ्या साठी आश्चयाऀचा धक्का होता, भाऊ झुरणच्या जाण्याने तू दुःखी होतास, वेडिंग अॅनिव्हसऀरी तू कधी साजरी केली नाही.
आपल्या सहलीमध्ये उत्साही कलाकार होते, त्यांनी मात्र धमाल केली, हाॅटेलच्या एका हाॅलमध्ये कायऀक्रम पार पडला, तुला चांगले आरोग्य आणि विवाहाच्या सुवर्ण महोत्सव,हिरक महोत्सव पाहण्याचे भाग्य लाभो यासाठी प्रार्थना केली पण नियतीच्या मनात वेगळंच होतं.
पॅट्रिक तू अतिशय शांत, विनम्र, प्रेमळ, सहकार्य करणारा,मोजकच पण विनोदी बोलणं , उत्कृष्ट लेखन अशी तुझी ओळख, तुझ्या तिन्ही मुली अमेरिकेत स्थायिक आहेत त्यामुळे सहा महिने अमेरिकेत, सहा महिने घरी असा तुमचा प्रवास सुरू होता, त्यामध्ये सहली मध्ये सहभागी होत होते,सहल झाल्यानंतर सहली बदल लेखन असायचं, पुन्हा एकदा घरबसल्या सहलीचं दशऀन होतं होते,
सहलीमध्ये तू आपल्या मधुर आवाजात काही गाणी गायली, तुमच्या घरात तीन पिढ्यात म्हटली जाणारी कविता फार सुंदर रीतीने सादर केली, नवीन घरात आई नको ही एक हृदय स्पर्शी कथा कथन केली,
खेळीमेळीच्या वातावरणात सहल सुखरूप पार पडली, लवकरच आपण भेटणार होतो, हाॅस्पीटल मध्ये असताना तू म्हणत होता आता स्कॅन्डिनेव्हियाला जायचं आहे प्रवासाची तयारी करा,तू तर अनंताच्या प्रवासाला निघाला यावर आमचा विश्वास बसत नाही, आमचं मन सुन्न झालं आहे.
अचानक काळाने अशी का झडप घातली ॽ
मंगळवार तुझा मरणवार कसा झाला ॽ
वेरोन आणि कुटुंबियांपासून तुला दूर का नेलं ॽ
मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्या पासून का हिरावून घेतलं ॽ
अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तू या जगात नाही यावर आमचा विश्वास नाही
तुझं अस्तित्व, तुझ्या आठवणी, तुझं लेखन, त्या बरोबर तुझं नेत्रदान, त्वचा दान आहे .
कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची सहनशक्ती मिळावी, तुझ्या आत्म्याला चिरशांती लाभावी ही आपल्या एस्.एस्.सी. 71बॅचतफेऀ भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹
सांतान परेरा
एस्.एस्.सी.71बॅच ग्रुप
सेंट जोसेफ हायस्कूल नंदाखाल .
—------------------
आज सोमवार ६ मे २०२४, मी आपल्या सर्व वर्गमित्र आणि वर्गमैत्रींनिना आठवण करून देत असत्यांना माझं मन अतिशय दुःख, वेदना ह्यांनी भरून आलेलं आहे. आणि हे दुःख आपल्या प्रत्येकांच्या हृदयांत नक्कीच असून ,ते राहाणार आहे.आज ६ मे ह्या दिवशी आपण आपल्या वर्गमित्रांला ,म्हणजे स्वर्गवासी पॅट्रीक डिमेलोला त्याच्या ७० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देणार होतो, पण आज आपणावर त्यांची ७० वी जयंती साजरी करण्याची वेळ आली असून,आज आपण त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत. आपल्या सर्वांचे हृदय जड अंतःकरणाने भरलेले असून डोळ्यात अश्रू येत आहेत.मित्रांनो आज आपल्या हातात फक्त प्रार्थना हे एकमेव साधन आहे .
आज आपले वर्गमित्र पॅट्रीक डिमेलो जरी आज आपल्या मध्ये शरीराने नसले,तरी त्याचे अवयव ह्या जगात कार्यरथ आहेत. अवयव दान करून आपल्या सर्व वर्गमित्र, वर्गमैत्रींनि समोर मोठा आदर्श ठेवला आहे.
आज आपण सर्वजण त्यांच्या साठी प्रार्थना करू या, परमेश्वराने, त्यांच्या सर्व पापाची क्षमा करून पॅट्रीकला स्वर्गीय राज्य बहाल करावे आणि हे दुःख सहन करण्यासाठी त्यांची पत्नी वेरोनिका, त्यांच्या मुली,जावंई , आणि कुटुंबीय ह्यांना धीर , शक्ती , आणि आधार मिळो, हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना 🙏🙏✝️🌹🌹.
—--------------------------------
आज 6मे आप्पा तुझा 70 वाढदिवस.तुला शुभेच्छा देताना अंतकरण खूप जड झाल्यासारखं झालंय. कारण आपल्या परिवारातील कोणाचाही वाढदिवस असो त्याला सगळ्यात पहिला फोन तुझाच असायचा. पण आज तुझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आमचे हात आणि शब्द थरथरत आहेत. काल आपल्या लियमने पहिले ख्रिस्त शरीर घेतले.कालचा दिवस आपल्या कुटुंबातील प्रत्येकांसाठी खुप आनंदाचा दिवस होता.आप्पा हे पाहण्यासाठी तुअसता तर लियम बद्दल व्हाट्सअप वर भरभरून तू त्याला शुभेच्छा दिल्या असत्या . पण देवाची योजना काही अलगच होती.आपली आग्नेसबाय मला अधून मधून विचारते हॉस्पिटलमध्ये असताना आप्पा तुला काय बोलला . मी तीला काय सांगू . तुझ्या वेदना मला देखील कळून दिल्या नाहीत.तर बायला मी काय सांगू.शेवटी तुझ्या बद्दल एकच सांगेन...
कविता करन सोपं नसतं एखाद्यावर अगदी सहज, पण ज्याने स्वतः अतीव दुःखाला सहज पचविताना, दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानला... आणि मानत होता.
असं अगदी दुर्मिळ व्यक्तिमत्व तुझं...
चेहऱ्यावर हास्य सदैव...
आतून नाना वेदना...
पण तरीही दिलखुलास.., कळत होतो आम्हाला, पण तुझा हाच स्वभाव खूप भवतोय सगळ्यांना, आम्हा सगळ्यांच्या वाढदिवसाला आवर्जून उपस्थित राहून कायम चांगला शुभाशीर्वाद देणारा आप्पा आज देवराज्यात जीजी, बाबा,जुरण बरोबर केक कापून आपला वाढदिवस नक्कीच साजरा करेल.😢🙏
—---------------------------------
पॅट्रीक डिमेलो श्रद्धांजली.
पॅट्रीक आमच्या मित्रा तू लवकर का निघालास
अर्ध जग फिरायचे सोडून गेलास.
तू इतका जीव लावणारा होता जवळ आले तेव्हा कळलं तुझ्यामध्ये दिलदार मित्र दडला होता. तुझ्या देहदृष्टीवरून पाहता समजत नव्हतं आज्ञाधारक मुलगा, कर्तव्यदक्ष पती, प्रेमळ पिता, संवेदनाशील बंधू,
कराव दान, नयनात करूणा, मुखात विलोभनीय हास्य, किती गुणाची उधळण तुझ्यात तू मात्र मिळून मिसळून सगळ्यात. तुझ्या ठायी असलेल्या शब्दाची माया आठवणीने साठवलेल्या खजिन्याची छाया स्मृतीना उजाळा देत मनोरथ रचण्याची किमया लीलया सर्वांना आपल्या कवेत घेतलं भाया . विना छेडता मधुर गीत येती गाण कोकिळा गाता सुदंर सुर कानी पडती पण तुला जागविता डोळ्याच्या कडा ओलाविती.
एस एस सी मित्राचा तू जान , रॉयल ग्रुप ची तु शान सदा आमच्या मनात राहील तुझा मान देवा सगळे मिळून तुला घालतो एकच आण लवकर घे आमच्या पॅट्रीकला स्वर्ग धाम.
🙏अंतोन डाबरे
रॉयल ग्रुप.
—---------------------------------