आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

 जगात दोनच गोष्टी वक्तशीर आहेत त्या म्हणजे सुर्य आणि मृत्यु. मृत्यु हा अटळ असतो. तो चोर पावलांनी येतो. तो कल्पना देऊन येत नाही. तो बेमालूम पणे येतो. पण त्याचं स्वतःची वेळ मात्र ठरलेली असते. तो वक्तशीर असतो. नियतीने आखलेल्या अटळ रेषा कोणाला पुसतां येत नाहीत.

  एलायस मृत्युने तुला दोन वर्षांपूर्वीच कवेत घेतलं होतं. तु बरा होऊन फिरायला लागलास. पुन्हा जेष्ठ नागरिकांच्या सहलीत सहभागी होऊ लागलास. त्यात एक-दोन फॅारीन टुर्स सुद्धा तू केल्यास. तु पर्यटनाचा भोक्ता होतास. परंतू नंतर मात्र तुला आजारपणाच्या महागड्या बिछान्यावर जावं लागलं. तुझ्या आजारपणात रेडियेशन व केमोसाठी व डॅाक्टर भेटीसाठी सुकीबायला तुझे तिन्ही भाऊ, भावजी व मेहुणा नेल्सनची फार मदत झाली ते आम्हालातरी विसरतां येणार नाही. तुझ्या सेवेत आमची सुकीबाय थकलेली दिसत होती पण तीने धीर मात्र सोडला नव्हता. तिचे अविरत प्रयत्न चालू होते. तुझ्या वेदना ती स्वताकडे घेऊ शकली नाही हाच काय तो फरक.  

   एलायस , तू एक चांगला मित्र होतास. तुझा मित्र गोतावळा मोठा होता. स्वभावाने शांत व मनमिळावू होतास. तू स्नेहाळ अंत:करणाचा होतास . कोणाशीही तुझं वैर नव्हतं किंबहुना वैर कशाशी खातात ह्याचा तुला स्पर्श नव्हता, गंध नव्हता आणि दर्पही नव्हता. आपली तुलना तू दुसऱ्याशी कधीच केली नाहीस. स्वत:ची किंमत तू स्वःताच ठरवत होतास. दातृत्व हा तुझा गुण होता. गावातील लग्नकार्यात तुझा डान्स बघण्यास गर्दी जमत असे. ॲक्टर भगवानचा कैची डान्स, राजकपूरचा आवारा डान्स ह्याची हुबेहुब नक्कल तुच करून दाखवावीस. बेलबॅाटम पॅन्ट आणि कानावरील केसाचा कट तुला खूप शोभून दिसायचा. तूझ्या तरुणपणातील रूपापुढे सिनेमा नायकही फिके होते.. जुण्या गाण्याबरोबर जुण्या पिक्चरची तुला फार आवड होती. तू धार्मीक वृत्तीचा होतास. 80 वर्षाचे आयुष्य जगणाऱ्यास चांगले आयुष्य लाभले असे आपण समजतो. तू फक्त 67 वर्षे जगलास म्हणून तू आम्हाला हवा होतास. मोजल्या जाणाऱ्या गोष्टी संपतात. वय हे मोजले जाणाऱ्यापैकी आहे. तुझ्या बाबतीत ते लवकर संपले. म्हणून भगवंताकडे एकच प्रार्थना “मृत्योर्मामृतं गमय॥” ( मृत्यूसे अमरता कि ओर ले चलो।)

मृत्यु नेतो ते एक शरीर असते व मागे ठेवतो ते कर्तृत्व आणि स्मृती असते.

“देहे त्यागीता, किर्ती मागे उरावी” - समर्थ रामदास म्हणतात “ ज्याला प्रारंभ आहे त्याला शेवट आहे”

                 🙏🏿


 //// पॅट्रीक डिमेलो ////

            फलश्रुती 

     दोनतलाव -पिपरी


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013