वासू (१८/१०/२०१९)

 आठवण फार जुनी म्हणजे पन्नास वर्षाहून जास्तच. म्हणजेच कळसू दमेल परीवारातील पन्नास टक्क्याहून जास्त जनांचा जन्मही झाला नव्हता. 


तेव्हा, एकदा आपले मास्तरकाका ऊंबरगोठन नाक्यावरून घरी येत असताना एक लहान म्हणजे आपला सेनेट किंवा क्लिंट ह्यांच्या वयाचा मुलगा गोंधळलेल्या स्थितीत त्यांच्या नजरेस पडला. तसा नाकी डोळी व्यवस्थित दिसत होता . मास्तर काकांना वाटले की रस्ता चुकलेला मुलगा असावा. असा विचार करून मास्तर काका त्या मुलाजवळ गेले. चौकशी करताना त्या मुलाचे नाव त्याने सांगितले पण कुठचा काय हे मात्र तो काही सांगत नव्हता. बोलण्याच्या भाषेवरून तो आगरी/खारपाटील समाजाचा असावा असे मास्तर काकांनी लगेच ओळखले. परंतु एवढा मोठा मुलगा आपला पत्ता किंवा गावाचे नाव सांगत नाही ह्याचा अर्थ हा मुलगा नापास होऊन किंवा शाळेत जायचा कंटाळा किंवा घरात छोटं-मोठं भांडण करून रागाने घरातून पळालेला आहे हे मास्तरकाकांनी लगेच जाणले. घरी येतोस काय? विचारतां लगेच तयारही झाला. चांगल्या घरातील मुलगा दिसतोय म्हणजे नक्कीच त्याचा शोध घेत त्याचे आईवडील किंवा नातेवाईक येतील व दरम्यान आपणही त्याला हळूहळू बोलतं करून त्याच्या जवळून माहीती मिळवू असा विचार करून मास्तरकाकांनी त्याला घरी आणले. आपल्या मुलासारखे ठेवले. लवकरच तो घरात अगदी मिसळून गेला. बरेच दिवस निघून गेले तरी ह्या मुलाचा वारस कोणी येत नव्हता .ह्या मुलाचे नाव वासू . पेदरबाबा,जावड्याअण्णा , फरशाआप्पा ह्याच्या बरोबर आडाभाट, पिपरी, व रूमाव वाडीत रहाटाला बैल जुंपूण शिपणे करू लागला. (तेव्हा काकडा, मोगरा, जर्मन म्हणजेच फुलाचा धंदा नव्हता). बैलांना वाल- मका खायला घालून विहीरीवर पाणी पाजायला न्यायचा. वासूने लवकरच सर्वांची मणे जिंकली. रोज संध्याकाळी आंघोळ करून केस नीट विंचरून ओटीवर बाकात बसायचा. जेवायला सुद्दा पेदरबाबा, जावड्याअण्णा, फरशा आप्पा बरोबर बसून जेवायचा. वासूची अजून एक आठवन म्हणजे त्यावेळी राजकपूरच्या “तिसरी कसम” मधील “सजन रे झुठ मत बोलो, खुदा के पास जाना है। ना हाती है ना घोडा है, वहा पैदल ही जाना है।” है गीत बिनाका वरती फार हिट होत चाललं होतं. सर्वांच्या तोंडी हेच गाणं लागलेलं असायचं. वासूही त्याला अपवाद नव्हता. संपूर्ण दिवस वासूच्या तोंडी हेच गाणं असायचं. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा रेडीओ वरती हे गाणं लागायचं तेव्हा आपल्या कुटुंबातील लोक लगेच म्हणायचे कि वासूचं गाणं लागलाय. असं वासू अन त्या गाण्याच समीकरण जुळलं होतं. 


असेच दिवस निघून जात होते. एके दिवशी सर्वजण ओटीवर बसलेले असताना (त्यात वासूही होता) सेंज्यावरच्या क्राॅस जवळून धोतर, सफेद कमीज, कानात वाळी व डोक्यावर सफेद फडका गुंडाळलेला एक दोसतवजा म्हातारा माणूस येताना दिसला. व थोड्याच वेळाने तो म्हातारा माणूस आपल्या घराच्या दिशेने वळला. हे सर्वांच्या लक्षात येण्या अगोदर वासू ओटीवरून केव्हा सटकला हे कोणाच्याही लक्षात आले नाही. खरं म्हणजे वासूने त्या म्हाता-याला ओळखले होते आणि म्हणूनच वासू तिथून सटकला होता. तो माणूस जसा घरी आला तसे मास्तरकाकालाही संशय आला. त्यांनी त्यामाणसाला बाकात बसायला सांगितले. कोणालातरी तांब्या पाण्याचा आणायला सांगितले. पाणी प्यायल्या नंतर तो माणूस मास्तर काकाशी बोलू लागला . त्याचा नातू रागाने गेल्याचं सांगितले. थोडासा रागाने गेला आहे तर येईल म्हणून थोडे दिवस वाट बघीतली. परंतु तो काही परत येत नाही तसा आम्ही त्याचा शोध घेऊ लागलो पण आशेचा किरण काही दिसत नव्हता. दोन दिवसांपूर्वीच खबर मिळाली की तो तुमच्या जवळ तुमच्या मुला प्रमाणे राहत आहे, आणि आम्ही अगदी निर्धास्त झालो.


(मास्तर काका मनांत हसत होते) त्याने पुढे असे सांगितले कि वासूचे आईवडील वारले आहेत व ह्या मुलाची सर्व जबाबदारी माझ्यावर पडलेली आहे. आता मी त्याला घ्यायला आलो आहे. अरे वासू कुठे गेला, वासू कुठे गेला म्हणून शोध सुरू झाला. सर्वजण सांगत होते कि आता इथेच तर होता. पण वासूने आपल्या आजोबाला लांबूनच ओळखलं होतं व तो सटकला होता. सर्वांनी तासभर शोध घेतला पण वासू काही सापडत नव्हता. तेव्हा मास्तरकाकांनी त्या आजोबाला सांगितले कि तो कुठेतरी लपलेला असेल व तुम्ही जाईपर्यंत तो बाहेर येईल असे वाटत नाही. तर आता तुम्ही परत जा व महीण्या नंतर या. तोपर्यंत आम्ही त्याची समजूत घालतो म्हणजे तो तुमच्या बरोबर यायला तयार होईल. 


पंधरा -वीस दिवसांत वासूची समजूत घातली गेली. हा-ना करत वासू मनापासुन तयार झाला. महीण्याभरा नंतर वासूचे आजोबा त्याला घ्यायला आले. वासू एकंदरीत सहा महीणे आपल्या घरी राहात होता. त्याने प्रत्येकांच्या मनात घर केले होते. मास्तरकाकाने वासूला त्याच्या आजोबा कडे सुपूर्द केले. वासूच्या आजोबाने मास्तर काकांच्या पायावर डोके ठेवले व मास्तर काकाचे पाय आपल्या आसवांनी धुतले. वासूला घरी जात असल्याबद्दल जसा आनंद होता तसं ईकडच्या सर्व प्रेमळ माणसांना मुकणार म्हणून दु:खही होते. 


वासूला आपले अश्रु अनावर झाले होते. आपल्या घरच्या माणसांनाही अगदी गहिवरून आले होते. आणि आता वासू जो घरी जाण्यासाठी निघाला होता तो परत न येण्यासाठीच.


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013