“मोठ्या बाबाला वाहीलेली आदरांजली” (१४/०७/२०२० )

 आज कळसू दमेल ह्यांचे जेष्ठ पुत्र आपले मोठे बाबा स्व. झुज्या फिलू दमेल ह्यांची १४१ वी जयंती. दिनांक १४/०७/१८७९ हा त्यांचा जन्म दिवस. तो दिवस सोमवार होता. ते १०/०१/१९५७ ला वारले. तो दिवस गुरूवार होता. ते ७८ वर्षे जगले. त्यांचे जोसेफ हे नांव त्यांच्या मृत्यू पूर्वीच आपले जोजेप आप्पा (वाडेकर) ह्याला देण्यात आले होते, तर मृत्यू नंतर तेच नाव आपल्या बायच्या जोज्याला देण्यात आले. आपले मोठेबाबा हे चांगले सहा फुट(feet) उंच होते. म्हणून त्यांना टोकर झुज्या म्हणून संबोधीले जायचे. ते केळ्याचे व्यापारी होते. ते आपल्या समाजात किंबहुना परीसरात नावदार (प्रसिद्ध) होते. त्यांच्या शब्दाला मान होता. आपल्या पंचक्रोशीत म्हणजे गास-भुईगाव ते अर्नाळा पर्यंत न्यायदानाचे काम करीत असत. तर अशा ह्या आपल्या मोठ्याबाबाच्या १४१ व्या जयंती दिनी त्यांना कळसू दमेल परीवाराचा मानाचा मुजरा, पुष्पांजली व आदरांजली. 🙏🏿🙏🏿


—-----------------------------------------------------------


मित्र हो, मोठ्या बाबाच्या जयंती दिनानीमीत्त मी आज सकाळी आपल्या ग्रुप वरती दोन शब्द लिहून त्यांना आदरांजली वाहीली होती. ग्रुप वरील ब-याच जणानी दाद देऊन बाबांना आदरांजली दिली. तर ब-याच जणांनी मनातून आदरांजली अर्पण केली. आप्पा सोदाडने तर त्याच्या स्व:ता बाबतीत घडलेला आदर्श दायी किस्सा सांगून बाबाना आदरांजली अर्पण केली. आपली सिस्टरबाय हिने तर मला थोड्यावेळा पूर्वी म्हणजे 9.00 वाजता फोन करून मोठ्या बाबाबद्दल आदर व्यक्त केला व तिचा मोठ्या बाबा संदर्भात एक अनुभव मला फोन वरती शेअर केला तो मी खाली देत आहे:-

तत्पूर्वी सिस्टरबायने कुटुंबासंदर्भात काही गोष्टीची चर्चा केली ती सुद्धा मला ईथे नमूद करावीच लागेल. ती म्हणाली की हे तिघे भाऊ शांत स्वभावाचे होते. ते रागीट असे नव्हतेच. त्यांचं आपसात फार जमत असे. ते कधीही भांडले नाहीत. कुटुंबात त्या तिघांनाही रिस्पेक्ट होता. ते तिघेही उंच होते. त्यामुळे आपल्या घरच्यांची ओळख टोकर झुज्यांच्या घरचे अशी होत असे. व अजूनही तशीच ओळख आहे. सिस्टरबाय -पेदरबाबा जेव्हा मशादकडे म्हणजे त्याच्या मामाकडे जात तेव्हा मामाकडील लोक म्हणत की टोकर झुज्याची मंडळी आली. मोठे असल्या कारणाने मोठ्या बाबांच्या शब्दाला मान होता. ते रागावत नसले तरी त्यांचा आदरयुक्त धाक होता. सर्व सुना त्यांचा आदर करीत. त्यांच्या कोटाच्या खिशात सोनेरी चैनला बांधलेले एक गोल आकाराचे घड्याळ असे. धोतर, सफेद कमीज, काळा कोट व लाल टोपी ह्या पेहरावात त्यांचं व्यक्तीमत्व फार रुबाबशीर दिसे. असो.

 

तर सिस्टरबाय लहान होती. एके दिवशी पुरुष मंडळी दुपारचे जेवन घेत होती. सिस्टर बाय पायरीवर बसलेली होती. तेव्हा सिस्टर बायला समजावण्याच्या सुरात पिलीबय तिला म्हणाली कि तू काहीच काम करत नाहीस. ती बघ शिजू (बाटीबाबाची बहीण) ती तिच्या बयचं (रोजीबय) लुगडं पण धुते. तेव्हा सिस्टर बाय म्हणाली की शिजू माझ्यापेक्षा सहा महीणे मोठी आहे. मी सहा महीण्यानंतर तुझं लुगडे धुईन. तेव्हा पिलीबय म्हणाली तू मला उलट बोलतेस, थांब तुझे नाव मी मोठ्या बाबांना सांगते. हा सर्व संवाद मोठ्याबाबाने ऐकला होता. ते लगेच म्हणाले थांब, कुठे गेली ती पोरगी. ऐकताच सिस्टरबाय जी पळाली ती ओटल्यावर बाकात जाऊन बसली. पण त्यानंतर मोठयाबाबाने तिला एकदाही विचारले नाही. पण आदरयुक्त भिती पोटी सिस्टरबाय चार-पाच दिवसतरी मोठ्याबाबा समोर गेली नाही. तर मित्र हो असे होते आपले आदर्शवत मोठेबाबा. त्यांना परत एकदा प्रेमपूर्वक श्रद्धांजली. सिस्टरबायचा अनुभव विस्मरणात जाऊ नये म्हणून लगेच शेअर केला. आपले बिशाआप्पा, पिपरी ह्यांनीही आज सकाळी अमेरीकेतून मला फोन करून मोठ्याबाबा विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. व त्याच्या बद्दल आदर व्यक्त केला. जवळजवळ विस मिनिटे माझ्याबरोबर ते मोठ्याबाबा विषयी बोलत होते. 


—-------------------------------------------------


आप्पाने फार जुनी पण सत्य घटना समोर ठेवलेली आहे. त्या वेळेला सर्वकाही जमीनदोस्त झाल्यामुळे आपल्या इथून निर्मळ चर्च दिसत होतं असे म्हणतात. मला काही तितकसं आठवत नाही. पण त्यानंतर समाजात फार गरीबी आली. पैसा तसा कोणाकडे जास्त नव्हताच. पण वारमोडीमुळे तो कोणाकडे राहीला नाही. फार हलाखीचे दिवस आले. भल्याभल्यांना रेशनचे निकृष्ट धान्य खावे लागले. मुलांच्या फि भरणेही पालकांना अशक्य झाले. आप्पाने म्हटल्या प्रमाणे सरकारने त्यावेळी 400/- रु तगाईत म्हणून दिली व नंतर ती शेतक-या कडून हळूहळू पाठी तगादा लावून वसूलही केली. ह्या तगाईत बाबत एक आठवण म्हणजे आपल्या परिवारात प्रत्येक कुटुंबात तगाईत घेतली गेली होती. माझे बाबा (इनूबाबा) व आल्या बाबानेही तगाईत घेतली होती व कालांतराने ती परतसुध्दा केली होती. पण पाच-सहा वर्षानंतर एक दिवस तलाठी आपल्या घरी तगाईत वसूल करण्यासाठी आले व म्हणाले कि बाबा व आल्याबाबबने तगाईत अजून परत केलेली नाही तरी आता द्द्यावी. बाबा व आल्याबाबा एकदम चिढले व म्हणाले आमच्या कुटुंबातील आम्ही सर्वांनी तगाईत भरलेली आहे. पण तलाठी काही ऐकत नव्हता. तो म्हणत होता कि सरकार दफ्तरी परत केल्याची नोंद नाही. तुम्ही परत केली असती तर तशी नोंद असती. मी दहा दिवसांनी परत येतो तोपर्यंत पैशाचा बंदोबस्त करा. व तलाठी निघून गेले. इथे बाबा-आल्याबाबाची हवा टाईट. काही पावती वगैरे सापडते का ह्याची शोधाशोध सुरू झाली. कपाटे, ट्रंक, पेट्या मधे मिळते काय ते बघू लागले. पण कुठेकाही हाती लागत नव्हते. तलाठ्याची मुदत संपत आली. आल्याबाबाने आशा सोडली आता पैसे भरावेच लागणार. पण बाबाला पैसे भरल्याची अगदी आठवण व खात्री होती. बाबाचं शोधकार्य चालूच होते. जीजीची पेटी दोन-तिन वेळा तपासून झाली होती. तरी बाबाला पावती पेटीतच मिळेल असे वाटत होते. रात्रीचे दहाचा म्हणजे सर्वाचं झोपायचं टाईम झालं होतं बाबाने पेटी उघडलीं. जीजी हातात दिवा घेऊन बाबाला उजेड दाखवत होती. बाबाने परत संपूर्ण पेटी तपासली व पेटीच्या डाव्या बाजूकडील तीन- चार छोटे खण सुध्दा तपासून झाले पण कुठे काहीच हाती लागले नाही. आता शेवटचा तपास म्हणून ह्या तपासात कधीही न उघडलेला चोरखण बाबाने उघडला. तिथे एका कोप-यात धोतराच्या चिंधीची छोटीशी पुडी मिळाली. बाबाने अगदी निराशेने ती पुडी खोलली. आणि आणि बाबाच्या निराशेचं अगदी नकळत आशेत रुपांतर झालं. आंधळा मागतो एक डोळा व देव देतो दोन. अशी अवस्था निर्माण झाली. बाबा त्याच्या पावतीचा शोध घेत होते. पण बाबाच्या पावती बरोबरच आल्याबाबाचीही पावती मिळाली. घरात रात्री साडेदहाच्या सुमारास एकच जल्लोष झाला. संपूर्ण घर जागे झाले. आनंदी आनंद. बाबा-आल्याबाबा एकदम खुष व बिनधास्त झाले. तर अशी हेती तगाईतीची कहाणी. 


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013