भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो
तेरे एक बूॅंद के प्यासे हम मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी च्या भर दुपारी अतिशय दुःखद, अविश्वसनीय परंतु दुर्दैवाने खरी असलेली असलेली एक बातमी वाॅटसअॅपच्या सर्व ग्रुप वर येऊन धडकली आणि सगळ्यांची झोप उडाली. सगळीकडे अंधारून आले. वाटा निस्तेज झाल्या आणि मन सुन्न झाले. पॅट्रिक तुझ्या जाण्याची ती बातमी होती. आदल्याच दिवशी तू हाॅसपिटल मधून घरी आला होतास हे समजले. मुळात तू रूटीन चेकअप साठी तुमच्या बी. ए. आर. सी. च्या हाॅसपिटल मधे गेला होतास. पत्नी वेरोनिका तुझ्या बरोबर येत होती परंतु तू तिला मना केले. तुझ्या मनात काय द्वंद्व चालले होते हे कोणाला समजले नाही. परंतु तुझा प्रवास क्षणाक्षणाला मॄत्यू च्या समीप चालला होता. प्रत्येक जिवंत माणसाचा प्रवास असाच असतो. तुला हाका ऐकू येत होत्या. मला आता गेले पाहिजे हे तुझ्या मनाने ठरविले होते. तुझी पूर्ण तयारी झाली होती. जिथून आलो तिथेच जाणे म्हणजे मॄत्यू. म्हणून तो कधी अ सुंदर असू शकत नाही. ज्याच्या वर प्रेम केले, ज्याच्या इच्छेप्रमाणे वागलो, ज्याचा ध्यास घेतला तेथ पर्यंत जाणे म्हणजे मॄत्यू असतो. पॅट्रिक सीमा चित्रपटातील तू एक प्यार का सागर है हे तुझं आव...