“ रोजान वहीनी, पिपरी ” (२९/०८/२०२०)
आज तारीख 29 Aug 2020 आपली रोजान वहीनी कळसू दमेल कुटुंबियांचाच नव्हे तर या जगाचा निरोप घेऊन स्वर्ग राज्याकडे निघालेली आहे. परमेश्वराने तिची सर्व पुण्य कर्मे जमेस धरून तिच्या हातून कळतनकळत घडलेल्या सर्व पापांचे शालन करून स्वर्ग राज्यात तिचे स्वागत करावे हि ईश्वर चरणी प्रार्थना.
तीन वर्षा पूर्वी एका दुर्धर रोगाने तिच्या शरीरात प्रवेश केला. पण रोग निदान होण्यास विलंब झाला. सुरूवातीला पोटदुखी व ताप ह्या आजारावर औषधोपचार झाले. थोडे दिवस तीला त्याऔषधावर बरेही वाटू लागले. पण पुढे हाच त्रास तिला परत परत सतावू लागला. मुलगा ॲास्ट्रेलीयात तर दोन नंबर मुलगी दुबईला सेटल झाले होते. त्यामुळे रोजानवहीनीची सर्व वैद्द्यकीय जबाबदारी तिची मोठी मुलगी रसिका व जावई सुनील ह्यांच्यावर आली. सुनीलने सर्व जबाबदारी अगदी लिलया झेलली होती. रोजान वहीनीला कधी त्रास जाणवू लागला की सुनील आपली फोरव्हीलर घेऊन घरी हजर व्हायचा. तिला ट्रिटमेट साठी हाॅस्पिटलला न्यायचा. सुनीलचा तर अशाप्रकारे हा एक नित्यक्रमच होऊन बसला होता. आम्ही म्हणायचो कि ‘जावई असावा तर सुनील सारखा’. कधीकधी रोजान वहीनीला फार आरामही वाटायचा. ती सुद्धा घरात बसून राहायची नाही. चर्चलाही तिचे जाणे चालू होते. अशातच तिला बरे वाटू लागल्या मुळे आपल्या लेकीचं बाळंतपण ऊजारण्या साठी तिने दुबईला जायचा निर्णय घेतला व एके दिवशी बेजम अंकल व ती दोघे दुबईला गेलेही. त्यावेळेला मी अमेरीकेत प्रभावी कडे होतो. अशातच एके दिवशी बेजम अंकलचा मला व्हाॅट्सॲप मॅसेज आला त्यात वेरोनला न सांगण्याच्या अटीवर त्याने लिहीले होते कि रोजानची प्रकृती बरी नाही, सारखी बिघडते. म्हणून कदाचित आम्ही इंडीयात परत जाणार. ऐकूण मी बेचैन झालो. वेरोनला सांगावेसे वाटत होते पण बेजम अंकलची अटही पाळायची होती. तसेबसे चार दिवस जाऊ दिले व एके दिवशी सकाळी मी बेजमला फोन केला. बेजमशी मी बोललो व वेरोनला रोजानशी बोलायचं आहे तर रोजान बोलेल काय म्हणून विचारले. रोजानला आता बरे वाटत आहे असे सांगून बेजमने रोजानवहीनीकडे फोन दिला. रोजान वहीनी एकदम खडखडीत बोलली. त्यामुळे आम्ही सुद्धा निर्धास्त झालो. आपली दुबईची टर्म व्यवस्थित पुरीकरून रोजान-बेजम इंडीयात परतले.
त्यानंतर थोड्याच दिवसाने रोजान वहीनीचा कळसूदमेल सूना व लेकी ह्यांच्या सोबत साठावा Birthday साजरा करण्यात आला. त्यातच एक आनंदाची बातमी आली ती म्हणजे राॅबीनची मुंबईला बदली झाली. राॅबीनने मुंबईत आपल्या मुलांचे शाळेत ॲडमिशन घेतले. व राॅबीन मुलुंडला फ्लॅटवरती राहू लागला. आपल्या मम्मी-पप्पाची सेवा करता यावी म्हणून राॅबीनने बेजमला व रोजानला फ्लॅट वरती नेले. थोडे दिवस मजेत गेल्यानंतर रोजान वहीनीची प्रकृती परत बिघडू लागली. राॅबीनने रोजान वहीनीला Fortis Hospital, Mulund ह्या एका चांगल्या मोठ्या हाॅस्पिटलला नेले. काहीक टेस्ट नंतर डायग्नोसीस झाले की रोजान वहीनीला कर्क रोगाने ग्रासले आहे. त्यानंतर एक-दोन दिवसातच राॅबीनने कळसू दमेल ग्रुपवर बातमी व्हायरल केली की मम्मीला कर्करोगाची लागन झालेला असून तिला लवकरच केमो चालू करण्यात येणार आहेत. ऐकून आम्ही सर्व जन हादरलोच. कारण काहीएक कल्पना नसताना अचानक आलेली ती बातमी होती. तरी पण ह्यात राॅबीनची वाहवा करावीशी वाटते ती म्हणजे कसलीही गुप्तता न ठेवता एकदम ट्रान्स्परन्सी अंगीकारून त्याने कुटुंबियांना बातमी दिली. व पुढे केमोबाबतीतही अपडेट्स तो कुटुंबियांना देत राहीला. इथे राॅबीनचं हे शहाणपण वाखानण्या जोगं होतं. पुढे दोन-तीन केमोतच रोजानवहीनीची प्रकृती सुधारू लागली. पण दुर्दैवाने पुढच्या केमो तिला झेपायच्या राहिल्या. केस गेले, शरीर कृश होऊ लागले. चेहरा काळा पडला. अशक्तपणा जाणवू लागला व शेवटी डाॅक्टरच्या सल्ल्यानेच केमो बंद करण्यात आल्या. केमो बंद झाल्यामुळे रोजानवहीनीची घरी यायची इच्छा झाली म्हणून राॅबीनने तिला घरी पोहोचवले. महीण्याभरानंतर रोजान वहीनीची तब्येत परत सुधारणा दाखवू लागली. केमो ऐवजी केमोच्या भागातील गोळ्या तिला लागू पडल्या. रोजान वहीनी अगदी ठणठणीत दिसू लागल्या. पिपरीत फिरू लागल्या. चेहरा उजाळला, भाजीवाला व पाववाल्याला बोलावून भाजी, दुध वा ब्रेड घेऊ लागली. बहुदा तो डिसेंबरचा महीणा असावा संध्याकाळची वेळ होती आपले फादर गिल्सन गाव भेटीला आले होते. माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांना चहाचा आग्रह केला. मला चहा नको एक ग्लास पाणी ध्या. पाणी पिण्याच्या निमित्ताने ते बसले व गप्पा झाल्या. त्यात रोजान वहीनीचा विषय निघाला असताना ते बोलले की त्या बाईला मी कम्यूनियन ध्यायला जात असतो. काही दिवसांपूर्वी तिची तब्येत फार ढासळली हेती. मनांत शंकेचा पाल चुकचूकत होती. पण आता बघा किती मस्त व तंदुरूस्त झाली आहे. फादरांच्या तोंडून हे ऐकूण मलाही समाधान वाटलं. हि गोष्ट मी रोजान वहीनीला सांगितली तेव्हा ऐकून ती सुद्धा खुश झाली.
डिसेंबर 30, 1979 रोजी लग्न होऊन शिलूकाका व बिबीकाकयची मोठी सून म्हणून तीने कुटुंबात प्रवेश केला व कळसू दमेल परीवाराची ती एक घटक बनली. आडाभाट, कानभाट, पिपरी व रानपट्टी ह्या वाडीत केळी , भाजीपाला व फुलांची शेती करून फार मेहनत केली. व आपल्या तीन मुलांना उच्च शिक्षीत करण्यासाठी हातभार लावला. धुमधडाक्यात मुलांची लग्ने केली. मुलगा राॅबीन ॲास्ट्रेलीयात तर लहान मुलगी ब्लांची दुबईला सेटल झाले. मोठी मुलगी रसिका विरार येथे गजबजलेल्या ठिकाणी ब्युटीपार्लरचं भव्य शाॅप खोलून बिजनेस करीत आहे. जावई सुद्धा चांगले सुस्वभावी, सुशिक्षीत असून. मोठा जावई सुनील स्वतंत्र बिजनेस करतोय व त्यात चांगला जम बसवला आहे तर छोटा जावई जाॅय दुबई येथे एअरलाईन्स कंपनी मधे चांगल्या पगारची नोकरी करीत आहे. सुनबाई गौरी सुस्वभावी असून नोकरी सोडून आपल्या तीन मुलांचे संगोपन करीत आहे. मुले थोडी मोठी झाल्यावर परत नोकरी करण्याची तीची ईच्छा आहे.राॅबीन मुंबईत रिलायन्स कंपनी मध्ये मोठ्या पोजवरती काम करीत आहे. आता तर रोजान वहीनी ही सात मुलांची आजी झालेली आहे. आपल्या दोन जावा व दोन दिरांना गोडीगुलाबीत व ऐक्यात राहण्याचा ती सल्ला देत राहीली. संपूर्ण कळसू दमेल कुटुंबात ती मिळून मिसळून राहात होती. आपले सासु-सासरे ह्यांची म्हातारपणातील सेवाही तिने उत्कृष्टरित्या निभावली होती.
जुलै मध्यानंतर रोजान वहीनीची तब्येत बिघडली. उलट्या होऊ लागल्या. पोटात अन्न स्थिरावयाचं राहीलं. फार कमी प्रमाणात लिक्वीड देणे चालू झालं. विकनेस वाढतच गेला. व तीस जुलै नंतर तीने खाट धरली. रोजान वहीनीच्या ह्या आजारात तिच्या तिन्ही बहीणी शिजूमावशी, कामीमावशी व माॅनिकामावशी ह्यांनी तिची फार सेवा केली. तिच्या कडे आळीपाळीने वस्ती साठी आल्या. रोजचं अंथरूण बदलणे, बाथरूमला घेऊन जाणे, रोज आंघोळ घालणे, वेणीफणी करणे, रूम स्वच्छ ठेवणे, रोजानला औषध देणे वगैरे कामे त्या पार पाडीत होत्या. माॅनिकामावशी तर दिवसाला दोन दोनदा तर कधी तीनदाही येत असे. रोजान वहीनीचे बंधू बाबू व वहीणी सुद्धा खबरेवर येऊन जमेल ती सेवा करीत होत्ते. तिच्या दोन जावा, जाॅना व जसिंता ह्या सद्धा आपआपल्या परीने सेवा करीत होत्या.
एके दिवशी राॅबीनला जवळ बोलावून तिने तिच्या दोन ईच्छा व्यक्त केल्या होत्या. पहीली म्हणजे “मला मरण कोरोना होऊन येऊ नये” तर दुसरी ईच्छा म्हणजे “ माझी मुले (राॅबीनची मुले) ब-याचं बर्षांनी ह्या घरात राहायला आली आहेत तर त्याच्या सहवासात राहण्या साठी मला परमेश्वराने एक वर्ष तरी आयुष्य वाढवावे.”
आपले यजमान पॅरालिसीस ने आजारी असल्यामुळे तिने त्याची फार काळजी पूर्वक सेवा केली. तिला मनोमन धास्ती वाटत होती की माझ्या नंतर त्याचे कोण करील व ते कसे शक्य होईल. म्हणून त्याचे सर्व काही करण्यासाठी मी अखेरपर्यंत त्याच्या सोबत असावे व त्याच्या मृत्यू नंतरच मला मरण यावे. पण माणसाच्या योजनेपेक्षा दैवी योजना काही निराळ्याच असतात.
तर अशा ह्या भरल्या कुटुंबातून आपल्या रोजान वहीनीने ही जी Exit घेतलेली आहे ती परत न येण्यासाठीच. एक चांगली लेक, चांगली बहीण, चांगली सून, चांगली वहीनी, चांगली माता, चांगली आजी, चांगली काकी अशा अनेक आदर्शयुक्त भूमिका बजावणा-या आपल्या सर्वांच्या लाडक्या रोजान वहीनीला कळसू दमेल कुटुंबियांची भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏿🙏🏿🙏🏿
----समाप्त---/