“मास्तरदा पोरं घरी पोहाेचलीत काय?” (१६/१२/२०१९)

 ते मे महीण्याचे दिवस होते. आम्ही लहान होतो. तिसरी चौथीत असू. लुईस अण्णा, जोजेप आप्पा व मी म्हणजे आम्ही तीघे त्यातल्या त्यात मोठे. व बरोबर जुरण नाना, वाली (भाई) व दुमिंग आप्पा हे तिघेजण आमच्या पेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान. तर एके संध्याकाळी आम्ही सर्वांनी समुद्रावर जाण्याचा बेत करून साधारण संध्याकाळी अंदाजे चार वाजता घरून निघालो. लहान मुलांनी हिंमत करून समुद्रावर जाण्याचा हा आमचा पहीलाच प्रयत्न होता. कारण ह्यापूर्वी आम्ही समुद्रावर जायचे पण कोणीतरी मोठं माणूस बरोबर असायचे. मोठ्या माणसाबरोबर अनेकवेळा समुद्रावर जाणं झाल्यामुळे आम्हाला समुद्रावर जायचा रस्ता साधारण पाठ झाला होता. आणि केवळ त्याच हिमतीवर आम्ही निघालो होतो. आपल्या रानावरच्या वाडीत जाताना डाव्या बाजूचा रस्ता जेलाडी गावातून जातो तर ऊजव्या बाजूचा रस्ता हा वटार गावातून जातो. त्या वेळी रिसाॅर्ट संस्कृती उदयास आली नव्हती. त्यामुळे जेलाडी रस्त्यावरून फार कमी लोक समुद्रावर जात असत. ऊजव्या बाजूच्या रस्त्यावरून म्हणजे वटार गावातून आल्यानंतरआपल्या वाडीजवळ एक वळण होतं व त्या वळनाजवळ एक घर होतं ते म्हणजे देवजीकाकाचं घर. ह्या देवजीकाकाचे आपल्या कुटुंबियाबरोबर फार जिव्हाळ्याचे सबंध होते. त्यांच्या घरासमोर एक बदामाचे धाड होते. वाडीत आलो की मग आम्ही मुलं तेथे झाडाखाली पिकलेली बदाम ऊचलण्यासाठी जात असू. देवजीकाकाच्या घरा जवळून पुढे हा रस्ता काठा ह्या गावात जातो. नंतर तो रस्ता पुढे समुद्रावर जातो. पण समुद्रावर जाताना ह्या रस्त्यात तीन भलेमोठे वाळूचे साधारण १० ते १२ फुट उंचीचे बांध लागत असत. त्याला टेक म्हणत असत. धावत धावत टेक चढणे व त्याच स्पीडने खाली ऊतरणे, परत चढणे -परत ऊतरणे व परत एकदा चढल्यानंतर वरून समुद्र दिसत असे. ह्या टेकची चढऊतार करताना मजा जरी येत असली तरी चांगली दमछाक ही होत असे. माझ्या माहीती प्रमाणे हे बांध (टेक) अर्नाळा पासुन कळम-भुईगाव पर्यंत होते. पुढे मातीऊपसामुळे हे टेक नाहीसे झाले व ती मजा निघुन गेली.


तर ही सगळी मजा लुटत आम्ही छोटी मुलं गम्मत जम्मत करीत एकदाचे समुद्रावर पोहोचलो. समुद्राच्या लाटात पाय बुडवले, ओल्या वाळूवर रेघोट्या मारल्या, स्वताची नावं लिहीली, निरनिराळी चित्रे काढली, खुब-या कवड्या गोळा केल्या, वाळूतील छोट्या छोट्या कुर्ल्याच्या मागे धावलो, वाळूत खोल खड्डे खणून त्यात ऊभे राहून वाळूने खड्डे बुजवून एकमेकाला वाळूत अडकवून ठेवण्याचे खेळ खेळलो. आणि हे सर्व करत असताना आम्ही किणा-यावर कुठच्या कुठे भरकटलो ते कळलेच नाही. सुर्य समुद्रात बुडायला सुरूवात झाली तसे आम्हीही घरी परतजायला निघालो. पण.... पण व्हायचं तेच झालं. आमचा रस्ता चुकला. आम्ही भलत्याच रस्त्याने निघालो. आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा सगळ्यांच्याच तोंडाचा पारा ऊतरला. सगळे भयभीत झालो. चालता चालता एक घर दिसलं थोडा जीवात जीव आला. आम्ही त्या घराजवळ पोहोचलो. ओटीवरती मेढीजवळ एक काका बसलेले होते. त्याच्या जवळ जाऊन आम्ही रडायला लागलो. त्याने चौकशी केली की तुम्ही कुठून आलात. आम्ही त्याला मास्तरकाकाचं नाव सांगितलं व आपल्यावाडीत धंदा करणारे यशवंत काका व काशिनाथकाका ची नावे सांगितली. तेव्हा तो म्हणाला कि यशवंत काकाकडे सोडलं तर चालेल काय? आम्ही लगेच हो म्हटलं कारण यशवंत काकाच्या घरापासून सर्व रस्ता आम्हाला ठाऊक होता. थोड्या वेळाने काका जागेवरून ऊठला व त्याने खुंटीवरील कब्जाच्या खिशातून विडीचे पान- तंबाखू काढले आणि पानात तंबाखु घालून त्याने त्याची विडी बनवली व ती पेटवून तो झुरके मारण्यासाठी परत मेंढीजवळ बसला. तो परत खाली बसल्याचे पाहून आम्ही घाबरलो, तर जुरन, वाली, दुमिंग रडायला लागले. तसा तो काका ऊठला व चला म्हणून पुढे चालायला लागला आणि आम्ही सर्व त्याच्या पाठी चालू लागलो. थोड्यावेळानंतर समोर काही खरे दिसायला लागली. चालता चालता एका घरा समोर काका थांबला व म्हणाला मुलानो ईथे थांबा म्हणून काका त्या घरात घुसला. ते घर यशवंतकाकाचे होते हे आमच्या लक्षात आले. तिकडनं पुढचा रस्ता आम्हाला ठाऊक होता. काका बाहेर यायच्या आत आम्ही रस्त्यावरून पळत सुटलो. अंधार होत चालला होता. साधारण दिवे लागनीच्या वेळी आम्ही घरी पोहोचलो. फार थकलो होतो. आंघोळी आटोपून जेवन करून घडलेला प्रसंग कोणालाही न सांगतां आम्ही गाढ झोपी गेलो. 


सकाळी ऊठलो तोपर्यंत मास्तरकाकाला यंशवंत काकाचा निरोप आला होता... “मास्तरदा पोरं घरी पोहचलीत काय?” त्यामुळे घरात एकच गोंधळ. त्यानंतर आमच्या जवळ चौकशी झाली. भित-भित घडलेला सर्व प्रकार सांगितला. आम्हाला चांगला दम भरून प्रकरण तिथेच मिटले गेले. जरी हे प्रकरण सर्वांसाठी मिटले गेले वाटत असले तरी ते माझ्यासाठी मिटले नव्हते. आता माझा ताबा आग्नेसबायने घेतला होता. तिने मला घाबरावयाला सुरूवात केली होती म्हणे “समुद्रावरती भुतं उतरतात , मारतात व घेऊन जातात. समुद्राच्या पाण्यात गेल्यावर समुद्र आपल्याला पाण्यात खेचून घेऊन जातो...वगैरे वगैरे.” मी खरोखर घाबरलो. पुढे पुढे मला भयानक स्वप्ने पडायला लागली. एकदातर स्वप्नात तिनं - चार भुतांनी मला पकडून मारलं व नंतर खांद्यावर उचलून घेऊन गेले. एकदातर एक भुत मला समुद्रातच घेऊन गेले. पुढे ही भिती फार काळ टिकुन होती. समुद्रावर जायचं तर नावच नव्हते. आणि जर कधी बाबाबरोबर समुद्रावर गेलो तर भुतं कुठे दिसतात का ते पहात होतो. पाण्याला पाय लावणे तर शक्यच नव्हते. लहान असल्या मुळे दुमिंग- वाली हा प्रसंग विसरलेही असतील पण मी कधीही समुद्रावर फिरायला गेलो तर हा प्रसंग डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नाही. जोजेपआप्पा तर कधी कधी समुद्द्राचा विषय निघाला तर हमखास म्हणणार कि “आपून घालवालते कहे”


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013