तांबडी बय (१५/०९/२०१९)

 ‘तांबडी बय’ म्हणजे अलीकडेच आपल्या कुटुंबातून देवाघरी गेलेले आपले तेत्याबाबा ह्यांच्या मातोश्री. तीला संपूर्ण गावात व आपल्या कुटुंबात तांबडी बय का म्हणत होते ह्याचा ऊलगडा अजूनतरी मला झाला नाही वा तसा जानूण घ्यायचा प्रसंग तरी कधी आला नाही. तीला घरातील जेष्ठ मंडळी नानी ह्या नावाने संबोधीत असत. तिचे खरे नाव आंजू असावं असं दुमिंगने सागितल्या सारखे पुसटसे आठवते( not sure). कळसु दमेल परीवारातील सहा सुनापैकी ती जेष्ठ सून. तांबडी बयला मुलगी नव्हती. घरातील सगळ्या लेकीवरती ती मुलीप्रमाणे प्रेम करीत असे. तसेच कुटुबियांच्या सगळ्या जावयांचा तिला फार अभिमान. आणि म्हणूनच की काय घरातील सर्व लेकी आणि जावई तीला भेटल्याशिवाय जात नसत. तांबडीबय प्रमाणे आपल्या तेत्याबाबालाही मुलगी नव्हती. म्हणून तांबडी बय थोडी असंतुष्ट होती. त्यामुळे तेत्याबाबांचा चौथा मुलगा (धाकटा मुलगा) मार्शल, म्हणजेच तांबडीबयचा धाकटा नातु हा लहान असताना ती मार्शलची वेनी-फनी करून डोळ्याला काजळ लावत असे व त्याच्या डोक्यावर बुचडा बांधुन त्यात नारद मुनी सारखा छोटासा फुलांचा गजराही माळत असे. छोटासा, गोरासा आणि सुधृढ मार्शल फारच सुंदर दिसत असे. 


आमच्या लहानपणीची तांबडीबय बद्दलची एक आठवण म्हणजे आमच्या माता वाडीत (भाटात) जात तेव्हा तांबडीबय आम्हा लहानमुलांना सांभाळ्ण्यासाठी घरी असे. संध्याकाळी साधारण चार-साडेचारच्या वेळी आम्हाला भुक लागल्यावर तांबडीबय भातावर साधं कालवन टाकुन भाजलेल्या बोंबीलाच्या काडीचा तुकडा तोंडात बर्यापैकी चावून, लाळ मिसळून लिबलिबीत झाल्यावर तो भाताच्या घासात अंगठ्याने खड्डा करून तो तोंडातील लगदा त्यात जिभेने सोडत असे. आणि त्या मोडक्याला (घासाला) असा चव लागत असे की पांच-सहा मुलामध्ये आपला नंबर कधी येतो त्याची आम्ही वाट पहात असू. आताजरी तो प्रकार विचीत्र वाटत असला तरी त्याची आठवण आणि चव आजही जिभेवर तरळायला लागते.


तांबडी बय बद्दलची अजून एक आठवण ती म्हणजे मी वर सांगितल्या प्रमाणे तांबडीबयचे आपल्या घरांतील मुलीवर फार प्रेम असे. तर आपल्या कुटुंबियातील एका ऊपवर लेकीचं सोयरीक जमवायची खटपट चाललेली होती. पण एका परक्या बाईने तिथे खोटी बातमी पुरवून खोडा घातला होता. ती बातमी जेव्हा तांबडीबयच्या कानावर आली तेव्हा तांबडीबय लगेच दुपारी त्या बाईच्या गावातील आपल्या नातेवाईकाच्या घरी जाऊन तीला तेथे बोलावून घेतले व मोजक्या आणि सोप्प्या शब्दात तीची कान-ऊघडनी केली व तिला आपल्या मुलीवरील खोटे आरोप मागे घ्यायला लावले, व बजावले की आपल्याने कोणाचे चांगले होत नसेल तरी किमान वाईट तरी करू नकोस. 

मला वाटते तांबडीबयचा हा आदर्श आपल्या कळसु दमेल परीवारातील नवीन सुनांनी अंगिकारायला हवा व तिच्यासारखे ऐक्य कुटुंबात जपायला हवे. तर अशा ह्या आदर्शवादी स्व. तांबडी बयला आदरांजली, पुष्पांजली व श्रद्धांजली.


----समाप्त---/

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013