“तेवचा प्रवास थांबला” (०४/०१/२२)
मातीपासून जन्माला आलेला एक देह आज मंगळवार ०४/०१/२२ सकाळी ९.३० च्या मिसानंतर मातीत विलीन झाला. आपल्या सर्वांची लाडकी तेव गेली. आपल्या तेवने आपणा सर्वांस सोडून आज मध्यरात्री १२.२० वाजता ह्या विश्वाचा निरोप घेतला.
स्व. कळसू दमेलच्या सहा नातसूना. पैकी चार झुज्या दमेल यांच्या सूना व दोन सिमा दमेल यांच्या सूना. या सहा सूना पैकी तेव ही सहावी व सर्वात लहान सून. तेव म्हणजे स्व. आल्याबाबाची (नानांची ) एकनिष्ठ धर्मपत्नी. पुढे नानांच्या खांद्यास खांदा लावून, काही प्रमाणात लोन घेऊन दोनतलाव गावाच्या सीमेवरील पिपरी ह्या वाडीत “समाधान” ही वास्तु उभारली. १९७४ साली ह्या वास्तुत आपल्या तीन मुलासह गृहप्रवेश केला. मग तेवने कधी मागे वळून पाहीले नाही. शाळेची पायरी न चढलेल्या तेवला शिक्षणाचे महत्व कळले होते. नानांबरोबर केवळ मेहनतीच्या जोरावर मुलांचे शिक्षण पुरे केले.मुलांच्या नोकरी नंतर त्याची लग्नेही थाटामाटात पार पाडली. अंगाखांद्यावर नातवंडे खेळू लागली व खरोखर हे कुटुंब घराच्या नावाप्रमाणे समाधानी झाले. पण निसर्ग नियमाप्रमाणे दोघापैकी एकाला अगोदर जावे लागते. सांताक्रुज येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या धाकट्या मुलाकडे जाताना सांताक्रुजला पोहचल्या नंतर हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने नानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेवचा आधार गेला. दु:ख अतोनात झाले. डोंगरा एवढ्या दु:खात समाधान कुटुंबिय बुडाले. पण तेवने हार अशी मानली नाही. आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या सहवासात समाधानी राहिल्या. वयाच्या ८५व्या वर्षा पर्यंत वाटत नव्हते कि तेव आता फक्त एकच वर्षात जाणार आहे. ती म्हणायची देवाने मला भरपूर उदंड समाधानी असे आयुष्य दिलेले आहे. आता परमेश्वरा कडे एकच मागणे आहे कि जे काही उर्वरीत आयुष्य मला देणार आहेस ते मात्र निरोगी असावे. तेव खुप जगली. आनंदात जगली. देवाने मला भरपूर काही दिले आहे. आपल्या एकूण १९ कळसु सुनावर तीने फार प्रेम केले. त्याची माया जमवून त्याची एक शिदोरी बनवून तेव आपल्याबरोबर घेऊन गेली. आम्हा मुलावर व नातवंडावर तीने खुप प्रेम केले. तेव सतत प्रार्थनेत राहीली. हातातील रोजरी तीने कधी खाली ठेवली नाही. लहान थोर सर्वा करीता ती प्रार्थना करत राहीली. प्रार्थनेतच बळ आहे असं ती सर्वांना सांगायची.
बिशा, मायकल, पांड्या, सांतान, मिना, व सुशिला ह्यांचं कवतूक करायची. रागावण्याचं व भांडायचं हक्काचं ठिकाण म्हणजे शिमनीबाय. पण शिमनीबायवर रागावल्यानंतर तिला पच्छातापही व्हायचा.आपल्या माहेरच्या कुटुंबावरही तीचे प्रेम होते. माझा कोको, माझा शॅजाव, माझी पशी, माझी बनू, माझी बाकी, माझा कुन्यात (बाणभाट), माझा मिंगू, माझा फराशी, माझा आलेस(जावई), हे तिच्या तोंडातील शब्द सारं काही सांगून जात. स्व. मरीमावशी साठी तीची प्रार्थना चालूच असायची. तसेच सर्व भाचे—भाच्या, बहीणींची मुले ह्यांचीही ती आठवन काढायची. खबरेवर आलेल्या सर्वांना ती ओळखायची. त्यांचा हात हातात घेऊन त्याचे चुबन घ्यायची. व दोनतीन वेळा बापाचे, पुत्राचे व पवित्र आत्म्याचे म्हणून पवित्र क्रुसाची खून काढायची. अशी ही लाडकी आई सर्वांची आवडती नसली तरच नवल. मरताना तेवने रात्री १२.२० वाजता शिमनीबाय, मायकल व पांड्या ह्याच्या कुशीत हळुवारपणे प्राण सोडला. तेवचा जिवन प्रवास इथेच थांबला. कळसुदमेल कुटुबात एक चांगलं मरण यांची नोंद झाली.
🙏🏿
----समाप्त---/