“हे वसईच्या गंधर्वा…..” 25/12/2023

 “हे वसईच्या गंधर्वा …….”

——————

हे वसईच्या गंधर्वा, तू का इतका उतावीळ झालास? कसली घाई झाली होती तुला. विजय, तुला स्वर्ग दरबारात पाहून बाळ गंधर्व, तानसेन,भिमसेन, लतादिदी ह्यांनी सुद्धा डोळे विस्फारले असतील. ते विचार करीत असतील कि ह्या तरूण युवकाचे पृथ्वीतलावरील काम इतक्या लवकर संपले असेल? नाही नाही नाही हे कदापी शक्य नाही. विधाता कुठेतरी नक्कीच चुकला असेल.

विजय, सारे वसईकर बांधव आज हाच विचार करीत आहेत. विजय तुझे जाणे न रुचणारे, न पचणारे व ना हजम होणारे आहे. तुझे सहज हसत हसत व खेळकर वृत्तीने जाणे समाजाला स्वीकारणे फार कठीण जात आहे. तुझा आलापभरी आवाज, कधी डोगराला वळसा घालणारा, कधी अवकाशात भरारी घेणारा तर कधी हृदयाचा वेध घेणारा, मंदीर भारावून टाकणारा व अंतःकरण हेलावणारा असाच होता. आवाजाचा हा कौटुंबिक वारसा तू व तुझी बहिण हेमा तुम्हा दोघांनी जपला असला तरी वृद्धींगत करायचं तुझं कार्य तू अर्धवटच सोडून गेलास. दोष तुला द्यावा कि विधात्याला द्यावा हेच समजत नाही. विजय तुझे जाणे म्हणजे “an unimaginable loss to church.” असे मला वाटते. समाजकारण व धर्मकारण बरोबरच तू राजकारणातही प्रवेश केलास. तुला तिथे लोकांचा पाठींबा मिळत राहीला कारण तुझे नेतृत्व मोठ्यांचा आदर व लहानांची कदर करणारे होते. तुझी स्टॅंडर्ड ॲाफ लिवींग नजरेत भरण्या सारखी होती. बरोबरच जीवनाची उंची वाढवणारे विचार, भावनांची आदर करणारे विचार, जिवनाला समृद्धीकडे नेणारे विचार म्हणजेच स्टॅंडर्ड ॲाफ लाईफ तुझ्यात पावलो पावली अनुभवायास मिळत होती. जगाच्या रंगमंचावर तुझ्या वाट्याला आलेली भुमिका छोटी जरी असली तरी तिची उंची महान होती. नको ते टाळणे व हवं ते कवटाळणे ह्या वृत्तीमुळे तुझी झेप यशस्वी होत होती. तुझे विचार सुंदर होते, विचाराला गंध होता. तुझे शब्द मधूर व रसाळ होते तसेच त्यात सामर्थ्यही होते. त्या शब्दाला धार होती. तुझ्या मोठेपणाला एक माणुसकीची झालर होती. तु फक्त आणि फक्त वर्तमानावरच प्रेम करीत राहीलास. प्रत्येक चांगल्या क्षेत्रात काही अपप्रवृत्ती प्रवेश करतात. म्हणूनच समाजात तुमच्या हातून चांगले कार्य होऊ लागले कि समजा तुम्हाला विरोधक तयार होणारच. मात्र तू त्याला अपवाद होतास. दुसऱ्याच्या प्रगतीची रेषा लहान करायची नसते तर आपली प्रगतीची रेषा मोठी करता आली पाहीजे ह्याची पूर्ण जान तुला होती. “देह जळो अन जग उजळो” ह्या दिव्याच्या वृत्तीने तू जगलास. जगाच्या रंगमंचावरील तुझी भुमिका संपल्यावरही लोकांच्या मनातून तू टाळ्या घेत राहीलास. तुझी सुरूवात छोटी होती पण शेवट मात्र एक मनात राहील असा भावनेचा सोहळा बनला. “इतिहासाला आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवायला वाटली पाहीजे म्हणजे आपले जीवन सुंदर झालं असे समजावे”

पण एक मात्र नक्की की “नियती हि सुत्रबद्ध असते तिच्या कार्यात हस्तक्षेप नसतो”

-🙏🏿-


//// पॅट्रीक डिमेलो ////

फलश्रुती

दोनतलाव-पिपरी


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भावपूर्ण श्रद्धांजली - पॅट्रीक डिमेलो

//// “बेड्याला लागलेली आग” //// - 21/06/ 2023

आपला एलायस डिमेलो - 14/01/2024

///// आई उर्फ दादी ///// - 29/08/2020

प्रतिबिंब - 06/05/2023

स्व. कु. ललिता सोमा राणेकर - २३/११/२०२३

मॅथ्यूचा हिरकमहोत्सवी वाढदिवस - 08/06/2023

दिंडा कुरेल लेखाला अभिप्रायपर पेडीकरांना पत्र - 22/09/2013