‘आपला शेंज्यावरील क्राॅस’ (१७/०५/२०२०)
आपल्या दोनतलाव गावात जाण्या करीता दोन वेशी आहेत. एक दक्षिणेकडची वेस जी नारवाळ व माडीघरच्या लोकास ऊपयुक्त आहे तर उत्तरेकडची वेस जी अटाळी वाडीत राहणा-या (रस्त्याची डावी बाजु) लोकाकरीता म्हणजेच आपले कळसु दमेल कुटूंब, शांत्याकाकाचे कुटूंब, फरशाकाकाचे कुटूंब, बाबूशेटचे कुटूंब, व मन्याकाका - आमाकाकाचे कुटूंब तसेच रस्त्याच्या उजवी कडे सालुकाकाचे कुटूंब, नयाघरचे कुटुंब व पुढे शिनोर कुटुंबीय ह्या नंतर हा रस्ता थेट आडाभाट वाडीत जातो. तत्पूर्वी सालुकाकाच्या दारासमोरून पच्शिमे कडे जाण्यासाठी या रस्त्याला एक छोटा उपरस्ता आहे ज्याचा वापर लडकूकाका कुटूंब, देगू दमेल कुटुंब, भोळ्याकाका कुटूंब व पेद्रूकाका-फिलूकाका कुटूंब (खंड्याकाका, कोकोमामा-संज्यावमामा) हे लोक करत असत. असो.
आपल्या गावात तसे दोन क्राॅस आहेत. एक दक्षिणेकडील वेशीवर पि दमेलच्या घरासमोरील क्राॅस. हा क्राॅस पि दमेल कुटुंबीयांचा प्रायव्हेट क्राॅस आहे. त्यामुळे त्या क्राॅस मधे गावक-यांचा तसा काही संबंध नाही. हा क्राॅस भव्य असा बनवलेला आहे. नक्षीदार रंगीबेरंगी कोरीव टाईल्सने मढवलेला आहे. बसण्यासाठी क्राॅससल्लग्न दोन बाक बनवलेले आहेत. ह्या क्राॅसच्या सणाचा उत्सव हे कुटूंबीय दर वर्षी मोठ्या उत्साहाने व दिमाखात साजरा करतात.
दुसरा क्राॅस म्हणजे गावाच्या उत्तरेकडील वेशीवरून गावात पोहोचल्या नंतर सालुकाकाच्या घरासमोरील सार्वजनिक जागेवरील क्राॅस. फार पूर्वी ह्या जागेत एक पोलवजा लाकडी स्तंभ किंवा खुंट होते. हे खुंट म्हणजे गावाच्या वेशीवरील एक खुण होती. पुढे नयाघरच्या घराचे खिडक्या-दरवाजे व फर्निचरचे काम चालु असताना हिटलर काकाने सागाच्या दोन लांब फळ्या आणल्या. त्यानंतर त्या फळ्यांवर सुंदर नक्षिकाम करून एक क्राॅस बनवून घेतला. नंतर गावातील होतकरू तरूणांनी एकत्र येऊन हा क्राॅस त्या सार्वजनिक जागेत जमीनीत ऊभा केला. ह्या कामात तोमास मिरांडा, हिटलरकाका, बाटीबाबा, आप्पा, अंजोमा, शात्याकाका, लाण्यापोर, पेदरबाबा. कोकोमामा वगैरेचा सहभाग होता. पुढे बरीच वर्षे गेल्यानंतर तोमासतात्यांनी “आपला एक चांगला काॅंक्रीटचा क्राॅस असावा” अशी कल्पना आपल्या गावकरी मित्रासमोर मांडली. हि कल्पना सगळ्यांच्याच पसंतीत उतरली. गावक-यांनी उत्स्फूर्तपणे वर्गणी जमा केली. सर्वांनीच मोठ्या आनंदाने वर्गणी दिली. एक विशेष म्हणजे आलेसतात्या (साईचे वडील) ह्यांनी सर्वप्रथम रपये २५/- ची वर्गणी दिली. त्यावेळची ती एक मोठी रक्कम होती. आणि नेमके त्याच वेळेला ताटीकाकाच्या स्लॅबचे काम करणारा वसईतील मन्यामिस्त्री ताटीकाकाच्या घरी राहात होता. त्याच्या मदतीने ताटीकाकाच्याच अंगणात हा भव्य काॅंक्रीटचा क्राॅस बनविण्यात आला. जवळजवळ २० ते २५ जणांनी हा क्राॅस खांद्द्यावर उचलून शेंज्यावर आणला. दोन दिवसांनी एक खड्डा खणून त्यात क्राॅस उभा करण्यात आला. बाजुला काॅंक्रीट टाकून क्राॅसचा Base तयार झाला. नंतर क्राॅसला प्लास्टर करण्यात आले. शांत्याकाका व तोमासतात्या ह्यांनी वसईला जाऊन आणलेल्या चिप्स बसविण्यात आल्या. फायनली एकदाचा क्राॅस उभा राहीला. ह्या क्राॅस उभारणीत लहाना पासून थोरापर्यंत सर्वांचाच हातभार लागला होता. फिलूकाका (आपल्या तेवचे बाबा) ह्या वयस्कर आजोबाचा उत्स्फुर्त सहभाग वाखानण्या जोगा होता. नारोळ विभागही उत्स्फूर्तपणे सहभागी होता. आजूबाजूचा परीसर स्वच्छ करण्यात आला. गावक-यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता बाकी होता तो क्राॅसचा उद्गाठन सोहळा. आणि तेही ठरलं. तारीख ठरली २९ मे १९६९. सोहळा कसा करायचा ह्याबाबतीत मिटींग झाली. ठरलं , सर्व गावक-यांना पेढे वाटायचे पण पेढे गावातच बनवायचे. २९ तारीख उजाडली. मास्तरकाकाच्या घरी पेढे बनविण्यात आले. संध्याकाळी फादरांच्या हस्ते उद्घाटन आणि प्रार्थना झाल्यानंतर पेढे वाटण्यात येणार होते. त्यावेळेला सहसा पेढा कुठे खावयास मिळत नसे. झालं. उद्घाटन झालं, प्रार्थनाही झाली आणि आता पेढे येतील याची आम्ही वाट पहात होतो. आणि, आणि काय? एकच गोंधळ उडाला. देगूनाना पेढ्यांनी भरलेलं टोपलं घेऊन जवळ पोहोचत होते तोच ठेच लागून टोपलीसकट देगूनाना खाली पडले. टोपल्यातील सर्व पेढे मातीत पडले. नको तेच घडले. पेढे खायची सर्वांची हौस मातीस मिळाली. त्या वेळची ती कटू पण सर्वांच्या स्मरणात राहीलेली एक आठवण आहे. पण त्यानंतरचे सर्व वार्षिक सण उत्साहात पार पडले व अजूनही पार पडत आहेत.
तर हा आहे आपल्या शेंज्यावरील क्राॅसचा थोडक्यात इतिहास
----समाप्त---/