“डाॅ. नरू जन्म शताब्दी वर्ष” (२८/६/२०२० )
सुजाता मॅडम, मी पॅट्रीक डिमेलो , तुमचा वर्गमित्र मॅथ्यू डिमेलोचा मोठा भाऊ. आज २८/६/२०२० रोजी डाॅ. गाळवनकर जन्मशताब्दी वर्ष संदर्भात व्हाॅट्सअॅप वर ्हायरल झालेला तुमचा लेख माझ्या वाचनात आला. अगदी अप्रतिम. डाॅक्टरांचा जीवनपटच तुम्ही सर्वांच्या डोळ्यांसमोर ठेवला. डाॅक्टरांचे कार्य , त्यांचे योगदान, त्यांची रूग्णसेवा, त्यांची रोगनिदानातील हातोटी, त्यांची सर्वसमावेशक धर्मिकता, त्याची शैक्षणिक क्षेत्रातील तळमळ व कार्य, त्यांचे समाजकार्य वगैरे सारख्या गुणांवर तुम्ही नेमके बोट ठेवलंत. डाॅक्टरांच्या कुटुंबियाबद्दल माहीती देताना त्यांच्या अर्धांगिनी लिलाताई, त्यांचे युरोलाॅजीस्ट चिरंजीव स्व. डाॅक्टर दिलीप, स्नुषा डाॅ. प्रिती, मुलगी रजनी व तिची स्नुषा प्राची ह्या सर्वांचं नजरेत भरणारं योगदान हे सर्व काही विरार-वसई करांची छाती अभिमानाने फुगवत होती.
त्यावेळी आपल्या अेरीयात दोनच डाॅक्टर MBBS होते. एक आगाशी चाळपेठ येथील डाॅक्टर किर्तने व दुसरे अर्नाळचे नरू डाॅक्टर . भारताच्या स्वातंत्र्याच्या एक वर्ष अगोदर म्हणजे सन 1946 मधे डाॅक्टरांनी अर्नाळा येथे आपला दवाखाना चालू केला तो केवळ सेवा हे व्रत घेऊनच. व जीवनाच्या अखेर पर्यंत ते तिथे सेवा देत राहीले. सुरूवातीला एक-दोन रुपये
फि घेणा-या डाॅक्टरांची फि पंधरा रुपया पलीकडे गेली नाही. गरीबाकडून ते फि घेत नसत तर उलट त्यांनाच खर्चासाठी वगैरे पैसे देत.
डाॅक्टरांचे चिरंजीव डाॅक्टर दिलीप ह्यांच्या बाबतीत मला आलेला एक अनुभव मला इथे शेअर करावासा वाटतो. जुन 2006, मी माझ्या आईला ॲन्जोप्वास्टी साठी नानावटी हाॅस्पिटलला घेऊन गेलो होतो. सोबत माझी सौ वरोनिका होती. जस्ट गेटवरती पोहोचलो होतो तेव्हा डाॅ. दिलीप बाजूने जाताना माझ्या नजरेत आले. न राहवून लगेच मी डाॅक्टर अशी हाक मारली. डाॅक्टरांनी मागे पाहीले. थोडीसी स्माईल दिली. जवळ आले व म्हणाले “नंदाखाल? “ मी होय म्हणालो. डाॅक्टर मला ओळखत नव्हते पण आईच्या पोशाखा वरून त्याने बरोबर ओळखले होते. हाॅस्पिटल मधे कोण आहे म्हणून विचारलं. मी आईची ॲंजोप्लास्टी आहे म्हणून सांगितले. डाॅक्टरांनी टाईम विचारले. आणि आईला घाबरूनको म्हणून सांगितले. माझ्या खांद्यावर हात मारत मी तिथे येतो म्हणाले व निघून गेले. आमच्या टाईमाप्रमाणे आम्ही गेलो. आईला मधे नेले. मी व सौ वेटींग हाॅल मध्ये बसून होतो. डाॅक्टर दिलीप हे दुस-या डिपार्टमेण्टचे. ते बिझी असतात.ते कशाला येतात असा विचार करून आम्ही ते मनातून काढूनही टाकलं. मी पेपर वाचत होतो तर वेरोनिका कुठलं तरी मॅग्झीन चाळत होती. मनांत भिती होती. साधारण एक तासाने डाॅ दिलीप येऊन माझ्या समोर उभे राहिले. लक्षात येताच मी हडबडून भानावर आलो व डाॅक्टरा समोर उभा राहीलो. डाॅक्टर मला म्हणाले कि आईची ॲंजोप्लास्टी व्यवस्थित पार पडलेली आहे. काळजी करू नका. अर्ध्या तासाने आईला वार्डमधे नेतील. मी थॅक्यू म्हणालो. डाॅक्टर निघून गेले. आईची ॲंजोप्लास्टी सुरळीत पारपडल्याचा आनंद तर झालाच पण डोळ्यांसमोर उभी राहीली ती डाॅ. नरूची त्यागमय व परोपकारी मुर्ती जी आज डाॅ. दिलीप मध्येही पाहायला मिळाली. डाॅक्टरांच्या कृतीस व स्मृतीस अभिवादन.
तसेच डाॅक्टर नरू ह्यांच्या दवाखान्यात घडलेला एक विनोद जो गाडीघोड्यात वा सहलीच्या ठिकाणी हमखास सांगितला जातो तो असा:-
एकदा एका कोळीबांधवाला नरू डाॅक्टरने बाटलीमधे लघवी घेऊन दुस-या दिवशी सकाळी यायला सांगितले. त्या कोळीबांधवाने एक बिअरची संपूर्ण बाटली भरून तो दुस-या दिवशी दवाखान्यात घेऊन आला व बाटली टेबलावर ठेवली. डाॅ. आपल्या नेहेमीच्या वेळेप्रमाणे दवाखान्यात आले तेव्हा त्याच्या नजरेतून ती बाटली सुटली नाही. मधे गेल्यावर त्याने कंपाऊंडर धर्माला हाक मारून विचारले कि टेबलावर ती मोठी बाटली कसली आहे? धर्मा काही बोलायच्या आत तो कोळी बांधव डाॅक्टर कडे धावत जाऊन म्हणाला डाॅक्टर ती बाटली माझी आहे. तुम्ही लघवी आणायला सांगितली होती ती आणली आहे त्यात. ऐकूण डाॅक्टरांचा पारा चढला व रागाने म्हणाले “भोस...च्या अर्नाळाच्या पारावर जाऊन विकायला बस” , बाटली भरून घेऊन आलाय. ऐकूण संपूर्ण दवाखाना हसत होता.
अजून एक आठवण म्हणजे नरू डाॅक्टरच्या दवाखान्यात एक फोटो होता त्यात नरू डाॅक्टरच्या हातात बंदूक आहे व समोर एक वाघ मरून पडलेला आहे. तर त्या मागची ऐकीव माहीती अशी आहे कि डाॅक्टरांना शिकारीचे फार वेड होते. ते नेहमी शिकार करण्यासाठी जात असत. असच एकदा शिकार करण्यासाठी जंगलात गेले असताना अचानक समोर आलेल्या बिबळ्या वाघाला आपल्या बंदुकीने बरोबर टिपले होते. “काळीज वाघाचं, गर्जना सिंहाची व झेप चित्त्याची” असं एक व्यक्तिमत्व होतं.
शेवटी डाॅक्टराबद्दल मी असच म्हणेन ;- “बुद्धीमत्तेचं भंडार असलेलं एक चालतं बोलतं विद्द्यापिठ, सर्व धर्म समभाव पाळणारे एक धर्मपीठ, या ज्ञान महर्षिचा जीवनपट म्हणजे साक्षात ज्ञानपीठ व परमानंदान आकंठ भरलेलं ब्रम्हपीठ”.
तर मॅडम पुन्हा एकदा तुमच्या लेखाला दाद देतो व तुमचे मनःपूर्वक आभार मानतो.
----समाप्त---/