लुजान डिसोजाची रिटायरमेंट - 07/12/2023
अलीकडेच एका भेटीत लुजान मला बोलली होती की मी डिसेंबर मधे रिटायर होत आहे. तेव्हाच मी विचार केला की लुजान बद्दल काहीतरी भावना व्यक्त केल्या पाहीजेत. मी जरी भाषण करू शकत नसलो तरी माझे विचार लेखनातून व्यक्त करून मी ते वाचू शकतो.
लुजानचा आमच्या कुटुंबियाशी परिचय अगदी अलिकडचा म्हणजे 2019 साली आम्ही जापान टुर वरती एकत्र होतो व नंतर 2022 साली आम्ही टर्की टुर वरती एकत्र होतो. त्या वेळच्या लुजान बरोबरच्या सहवासात आम्ही फार जवळ आलो. व तेव्हाच आम्हाला तिच्या खऱ्या स्वभावाची ओळख झाली.
लुजानच्या अनेक सुप्त गुणांची आम्हाला तीथे खर प्रचिती आली. लुजान म्हणजे एक स्मित हास्याचा धबधबा. लुजान म्हणजे प्रसन्नता, आनंद व खुशी ह्यांचा मिलाप. लुजान म्हणजे विनम्रता, आदर व माणूसकीने ओतपोत भरलेलं एक भंडार. लुजान भेटली म्हणजे समोर जणू बहरलेलं एक सदाफुलीच झाडच उभं आहे असं वाटे. एक प्रेमळ, साधं, भोळं, नम्र असं बहूआयामी व्यक्तीमत्व. मनाने दिलदार, वागणं जबाबदार व बोलनं खुमासदार अशी हि मुर्ती. आपल्या हातून छोटीशी नगण्य चूक जरी झाली तरी सॅारी शब्द तिच्या ओठावर पहायला मिळतो. केवळ अशा ह्या गोड, व मनमिळावू स्वभावा मुळेच लुजानचा मैत्रीनींचा गोतावळा फार मोठा झालेला आहे. आपल्या कार्यालयातही लुजानचे संबंध आदराचे व प्रेमाचे आहेत. कामात हातखंडा त्यामुळे ती वरिष्ठांची मर्जी सांभाळून आहे. सोहम आणि ओहम या दोन्ही शब्दांचा अर्थ ती जाणून आहे. ती पुरोगामी विचाराची आहे. लुजानच्या बाबतीत आपले स्वत:चे मत बनवा म्हणजे तुम्हाला लुजान समजेल. मग कुणी वंदा कुणी निंदा. सेफ डिस्टन्स काय असते ह्याची तिला जाण आहे. आपल्या मर्यादा ती ओळखून आहे.
यक्षाने विचारलेला एक प्रश्न असा होता की, काय सोडल्यावर माणूस प्रिय होतो? आणि त्या प्रश्नाचं उत्तर होतं “अहंकार”. अहंकाराची (इगोची) लागन तिला कधी झाली नाही. म्हणूनच ती सर्वांना प्रिय होती. माणसाचा इगो मोठा असतो तो मॅनेज करता यायला पाहीजे. या इगो बाबतीत एक किस्सा इथे मला नमूद करायला आवडेल तो म्हणजे रात्रीच्या वेळेला पॅसिफिक समुद्रात एक मिसाईलने भरलेलं लढाऊ जहाज जात होतं त्या वेळेला ज्युनियर कॅप्टनला सोमोरून एक लाईट दिसला. ते एक जहाज असावं व ते आपल्या समोरून येत असून आपल्याशी टक्कर होऊ नये म्हणून ज्युनियर कॅप्टनने मॅसेज पाठवला कि आपली टक्कर होऊ नये म्हणून तू बाजूला हो प्रत्यूत्तर आलं मी बाजूला होणार नाही तूच बाजूला हो. ज्युनियर कॅप्टनचा पुन्हा तोच मॅसेज व त्याला तेच उत्तर येते. ज्यु. कॅप्टनचा इगो दुखावला जातो व तो आपल्या कॅप्टनला कंप्लेंट करतो. कॅप्टन जहाजाला बाजूला घेण्याचा मॅसेज पाठवतो व त्यालाही नकारच येतो. इथे मात्र कॅप्टनच्या इगोला जबरदस्त धक्काच बसतो व तो पुन्हा एक कडक मॅसेज पाठवतो कि माझं जहाज मिसाईलने पूर्ण भरलेलं आहे, व तू बाजूला न झाल्यास मी मिसाईलने तुझं जहाज उडवून देईन . तेव्हा समोरच्या जहाजाकडून नम्रपणे उत्तर आलं की सॅारी मी बाजूला होऊ शकत नाही कारण मी लाईट हाऊसचा लाईट म्हणजेच दीपस्तंभाचा दिप आहे, कृपया आपणच बाजुला व्हावे. उत्तरावर कॅप्टन एकदम हादरतो. आपली चूक त्याच्या लक्षात येते व इथेच त्याचा इगो दबला जातो. म्हणून आपल्या इगोवर कंट्रोल असावं. लुजान इगो पासून खुप दूर असल्याचा अनुभव आपणांस येतो.
लुजान आपल्या जिवनात सुख, समाधान, समृद्दी आणि निरंतर शांती मिळविण्या साठी तसेच शारिरीक , मानसिक आणि वैचारीक आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी तिचा सतत प्रयत्न असतो. आपली सायकॅालॅाजिकल-हेल्थ, फिजिकल -हेल्थ, मेन्टल- हेल्थ आणि इमोशनल -हेल्थ ह्या बाबी तीने तंतोतंत सांभाळल्या आहेत.
लुजान हि एक हौशी कलाकार आहे. पर्यटनाची तिला फार आवड आहे. आता जगातील फारच थोडे देश राहीले असतील कि जीथे लुजान पोहोचायची बाकी असेल. पर्यटनात ती फार Enjoy करीत असते. सहप्रवाशा बरोबर ती मिळून मिसळून वागते. जेष्ठांना गाडी घोड्यात चढउतरण्यास, त्त्यांना हात देण्यास, त्यांच्या बॅगा उचलण्यास ती पुढे असते. हे सर्व आम्ही जापानच्या टुर मधे पाहीलेलं आहे. लुजानचा अजून एक गुण म्हणजे ती फोटोजेनिक आहे. एकटीचे फोटो घेत असतानाच एक एक ग्रुपचेही ती फोटो खेचत असते. लुजानला बाग, फुले, झाडे, डोंगर, दऱ्या व निसर्ग ह्यांची फार आवड. जपानच्या चेरीब्लॅासम टुर मधे तर ती अक्षरशा वेडीच झाली होती. चेरीब्लॅासमच्या फुलात अनेकांना सोबत घेऊन ती फोटोग्राफी करीत असे. चार-पाच जपानी मुलींना (गुडीया जापान की) बरोबर घेऊन ती फोटो घेत सुटली होती. तर काश्मिर टुरला काश्मिरी मुलीबरोबर (काश्मिर की कली बरोबर) ती फोटो घेत होती. तर अशी आहे ही विरारकी गुडीया नव्हे विरारकी कलीया.
लुजानला खरेदीची फार आवड आहे. टुर वरती ती आपल्या कुटुंबिया प्रमाणेच मैत्रीणींना देण्यासाठी सुद्धा भरपूर खरेदी करीत असते. तिचा हात मोकळा आहे. आग्रह केल्यास टुर वरती ती करमणूकी साठी प्रसंगी गीत ही गात असे. तिचा आवाज गोड आहे. सहलीला तीचं पहिले गाणं हमखास असते. ते म्हणजे इमानदार ह्या हिंदी मुव्ही मधील. त्यातील एक लाईन “ओर इस दिलमे क्या रख्खा है आपका प्यार छुपा रख्खा है, चिरके देखो दिल मेरा तो आपका नाम लिखा रखा है” । लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्या ध्यानात येईल कि ती ह्या गाण्यात आपल्या स्व. प्रियकराला साद घालीत आहे. हे गाणं बोलून झाल्या नंतर लुजान उसासा टाकते. क्षणभर शांत होते व प्रसंगी अश्रू ही ढाळते.
अत्यंत कुटुंब वत्सल लुजान जाणून आहे कि “United we stand, Divided we fall “! आपल्या बोलण्यात सासू-दिर- ननंदा- जाऊ ह्यांची भरभरून स्तुती करताना तिचं कुटुंब- प्रेम दिसून येते. लग्न झालेली मुलगी व 80 वर्षाची आजी ह्यांना आपल्या माहेरचा अभिमान असतो मग त्याला लुजान कशी अपवाद असणार. म्हणून प्रत्येक पंधरा दिवसांनी ती आपल्या आईला व बहीणीला भेटत असते. शेजाऱ्या पाजाऱ्या बरोबर व गावात सर्वा बरोबर तीचे संबंध स्नेहाचे आहेत.
लुजानला दोन सुंदर मुली आहेत व त्याही पेक्षा मोठा आधार देणारे व आई समान माणनारे दोन स्तंभासारखे जावई आहेत. दोन नात व दोन नातू ह्यांच्या प्रेमात लुजानचे जिवन परीपूर्ण आहे. लुजानची एक नात यंदा दहावीला असून ती फार हुशार आहे. तिच्या बाबतीत लुजानच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत.
लुजानची दिनचर्या अनुकरणीय आहे. सकाळी लवकर उठणे, एक तासाचे वॅाक करणे, पियानो वाजवून एखादे गाणे बोलून मन प्रसन्न व हलके करणे, संध्याकाळी योगा करणे. आपल्या घराची स्वच्छता व टापटीप पणा ह्यात लुजानला कमालीचा रस आहे. काही माणसं वेड लावतात त्या पैकीच एक लुजान. “ पैशाने श्रीमंत असणारी माणसं पदोपदी भेटतात पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्या साठी पावले झिजवावी लागतात.”
चर्च व इतर धार्मिक व सोशल कार्यात ती हिरीरिने भाग घेत असते.
“अडचणीत प्रामाणिक राहा, श्रीमंतीत साधे राहा, उच्च पदावर असताना विनयशील राहा व रागात असाल तर शांत राहा” हे आयुष्याचे व्यवस्थापन आपणांस लुजान मधे अनुभवायास मिळते. लुजानचा एकंदरीत आयुष्य-संघर्ष पाहता आपल्या निदर्शनास येते ते म्हणजे “अंधाराच्या गर्भात उद्याचा उषा:काल दडलेला असतो”.
तर अशी ही गुणसंपन्न व सर्वांना प्रिय अशी नंदाखाल-घोसाळीची लेक, लुजान येत्या 31 डिसेंबरला नेव्हल डॅाक ह्या सरकारी ॲार्गेनायजेशन मधून एका मोठ्या ॲाफिससरच्या हुद्या वरून निवृत्त होणार आहे. म्हणून लुजानला “नित्य नवा दिस जागृतीचा” हिच मनी इच्छा व शुभेच्छा. तसेच लुजान आज आपला हिरक महोत्सवी वाढदिवस साजरा करीत आहे. लुजानला उदंड, निरोगी व पिसफुल आयुष्याच्या शुभेच्छा व कंफॅार्ट झोन लाभावा म्हणून प्रार्थना. आनंदाचा स्नेहदिप लुजानच्या जिवनात सतत तेवत राहावा हि मनोकामना. शेवटी लुजान बद्दल एकच म्हणायला आवडेल ते म्हणजे :-
“जिस रस्तेसे तू गुजरे वो फुलोसे भर जाये”
धन्यवाद
🙏🏿
//// पॅट्रीक डिमेलो////
फलश्रुती
दोनतलाव-पिपरी